अपघातस्थळावरून धावली वंदे भारत; प्रवासी झाले स्तब्ध, दोन्ही मार्गिकेवरून वाहतूक पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 05:23 AM2023-06-06T05:23:57+5:302023-06-06T05:25:47+5:30
दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस ही पहिली प्रवासी रेल्वे घटनास्थळावरून साेडण्यात आली.
भुवनेश्वर/बालासोर : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातानंतर रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस ही पहिली प्रवासी रेल्वे घटनास्थळावरून साेडण्यात आली. नुकतेच दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे गाड्या अतिशय हळू जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना घटनास्थळाचे भीषण दृष्य पाहता आले. ते पाहून गाड्यांमधील प्रवासी स्तब्ध झाले. हे पाहणे किती पीडादायक आहे, अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या. अपघातस्थळाचा बहुतांश भाग हिरव्या कपड्याने झाकण्यात आला. दरम्यान, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी कोरोमंडल एक्स्प्रेसच्या दोन्ही लोको पायलटचे जबाब नोंदविले.
रेल्वेमंत्री बालासोरच्या बहनगा बाजार स्थानकावर बचाव आणि ट्रॅक दुरुस्तीवर लक्ष ठेवून आहेत. ‘आमची जबाबदारी अजून संपलेली नाही. बेपत्ता लोकांना शोधणे हे आमचे ध्येय आहे,’ असे म्हणत ते भावुक झाले. रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम संपल्यानंतर रात्री वाहतूक पूर्ववत झाली.
मृतदेह पाठविण्याचा खर्च ओडिशा सरकार उचलणार
रेल्वे अपघातातील २७५ मृतांपैकी १७५ जणांची ओळख आतापर्यंत पटविण्यात आली आहे. मृतदेह विविध ठिकाणी पाठिवण्याची साेय ओडिशा सरकार करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव पी. के. जेना यांनी दिली. साेमवारी सायंकाळपर्यंत २४ मृतदेह विविध राज्यांमध्ये पाठिवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चालक म्हणाला, आम्हाला हिरवा सिग्नल हाेता
रेल्वे मंडळाच्या सदस्या जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, आम्ही चालकाशी बाेललाे. ताे शुद्धीवर हाेता. गाडीला हिरवा सिग्नल मिळाला हाेता आणि त्यानुसारच गाडी पुढे नेल्याचे चालकाने सांगितले. हावडा-यशवंतपूर गाडीचा चालक आणि ए १ डब्यातील टीटीईसाेबतही आम्ही बाेललाे. त्यांनी माेठा आवाज ऐकल्याचे सांगितल्याचे सिन्हा म्हणाल्या.
अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसचा जखमी इंजिन चालक गुणनिधी मोहंती आणि त्यांचे सहायक हजारी बेहरा यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर भुवनेश्वरमधील एम्स रग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे मंत्रालयाने या दोघांना पूर्वीच क्लीन चिट दिली आहे.