देशातील सर्वात वेगवाग एक्सप्रेसचं तिकीटही 'सुस्साट', पण वेगळाच असेल थाट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 05:44 PM2019-02-11T17:44:42+5:302019-02-11T17:50:08+5:30
'ट्रेन 18' म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या एक्सप्रेसमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे दोन प्रकारचे डबे आहेत. वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.
ताशी १८० ते २०० किलोमीटर वेगाने धावू शकणारी देशातील सर्वात वेगवान ट्रेन - वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील आणि दिल्ली ते वाराणसी अंतर भरधाव वेगानं कापलं जाईल. या सुस्साट ट्रेनचं तिकीट किती असणार, याबद्दल कमालीची उत्सुकता होती. त्याबद्दलची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दिल्ली ते वाराणसी हे ७५५ किलोमीटरचं अंतर वंदे भारत एक्सप्रेस ८ तासांत पार करणार आहे. या प्रवासात फक्त दोन थांबे देण्यात आलेत. कानपूर आणि प्रयागराज. 'ट्रेन 18' म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या एक्सप्रेसमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे दोन प्रकारचे डबे आहेत. त्यापैकी चेअर कारचं तिकीट १,८५० रुपये निश्चित करण्यात आलं असून, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ३,५२० रुपये मोजावे लागतील. या दोन्ही तिकिटदरांमध्ये जेवणाची रक्कम समाविष्ट आहे.
'वंदे भारत एक्सप्रेस'ने तुम्ही परतीचा प्रवासही करणार असाल, तर या प्रवासासाठी चेअर कारचं तिकीट १,७९५ रुपये असेल आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे ३,४७० रुपये होतील. 'शताब्दी'च्या तिकीटदरांशी तुलना केल्यास ट्रेन-18 चं चेअरकारचं तिकीट दीडपट आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचं तिकीट १.४ पट अधिक आहे.
'ट्रेन 18'ची १८ वैशिष्ट्यं
- 'मेक इन इंडिया' योजनेचा हिस्सा असलेली भारतातली ही पहिली इंजिनलेस रेल्वे आहे.
- चाचणीदरम्यान या रेल्वेनं ताशी १८० किलोमीटरचा वेग पार केला असून, ती ताशी दोनशे किलोमीटर या वेगानं पळू शकते.
- कितीही वेगानं धावली तरी प्रवाशानं भरून ठेवलेली पाण्याची बाटलीही कलंडणार नाही, इतकी या रेल्वेची स्थिरता असेल, असा दावा करण्यात आलाय.
- १६ डबे असलेली ही रेल्वे पूर्णत: वातानुकूलित आहे.
- या रेल्वेची रचना अशा पद्धतीनं करण्यात आली आहे, की प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल.
- या रेल्वेला स्वयंचलित दरवाजे आणि स्लायडिंग फूटस्टेप्स असतील. प्रवाशांना वेगवान मोफत वायफाय आणि इन्फोटेनमेंट मिळेल.
- रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालयं असतील.
- रेल्वेत एलइडी लाइट्स, मॉड्युलर टॉयलेट्स आणि 'अॅस्थेटिक टच फ्री बाथरूम्स' असतील, शिवाय अपंगांसाठीही मैत्रीपूर्ण सुविधा असेल.
- रेल्वेच्या दोन्ही टोकांना ड्रायव्हर केबिन्स असतील.
- जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल.
- प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे असतील.
- सर्व डबे एकमेकांशी संलग्न असतील.
- ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.
- आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल.
- पहिल्या 'ट्रेन १८'मध्ये १६ चेअरकार डबे असतील. त्यातील १४ डबे 'नॉन एक्झिक्युटिव्ह' तर दोन डबे 'एक्झिक्युटिव्ह' असतील. प्रत्येक डब्यातील प्रवाशांची संख्या अनुक्रमे ७८ आणि ५६ असेल.
- 'एक्झिक्युटिव्ह' क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल.
- ही रेल्वे येत्या काळात 'शताब्दी एक्सप्रेस'ची जागा घेईल. सुरुवातीच्या टप्प्यात अशा नऊ रेल्वे देशात वेगवेगळ्या मार्गावर धावतील.
- ही रेल्वे बनवण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च आलेला आहे. आयात रेल्वेपेक्षा हा खर्च निम्म्यानं कमी आहे.