मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत? प्रवाशांसाठी रेल्वे सुरु करणार ‘यात्री सेवा अनुबंध’ योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:49 PM2023-11-30T13:49:51+5:302023-11-30T13:55:02+5:30

Vande Bharat Express Train: मुंबईकरांच्या सेवेत आणखी एका वंदे भारत ट्रेन येणार असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वेची नवी योजना नेमकी काय?

vande bharat express train likely to start from mumbai to jalna and know about indian railway new yatri seva anubandh yojana | मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत? प्रवाशांसाठी रेल्वे सुरु करणार ‘यात्री सेवा अनुबंध’ योजना

मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत? प्रवाशांसाठी रेल्वे सुरु करणार ‘यात्री सेवा अनुबंध’ योजना

Vande Bharat Express Train: देशभरात आताच्या घडीला ३४ वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आहे. वंदे भारत ट्रेनच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ होत असून, प्रवासांचा प्रतिसादही वाढताना दिसत आहे. देशातील अनेक मार्गांवर वंदे भारत ट्रेनसेवा सुरू करण्याचा मानस भारतीय रेल्वेचा आहे. यामध्ये मुंबईचा क्रमांक लागण्याची शक्यता आहे. मुंबईला आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मिळू शकते, असा कयास बांधला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-जालना मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू होऊ शकते. या प्रवासाचे तिकीट दर लवकरच ठरवण्यात येणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसने शैक्षणिक, धार्मिक, व्यावसायिक आणि पर्यटन स्थळांना जलदगतीने जोडण्यात येत आहे. तर सध्या राज्यातून सीएसएमटी ते सोलापूर, शिर्डी, मडगाव, नागपूर ते बिलासपूर, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर अशा पाच वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता नव्याने मुंबई ते जालना वंदे भारत चालवण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच पुणे ते बडोदा अशी वंदे भारत एक्स्प्रेस विचाराधीन आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी रेल्वे सुरु करणार ‘यात्री सेवा अनुबंध’ योजना

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वंदे भारत ट्रेनमधील  प्रवाशांना आणखी दर्जेदार सेवा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासन 'यात्री सेवा अनुबंध' ही योजना प्रायोगिक तत्त्वावर लागू करणार आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास ती 'वंदे भारत'सह 'तेजस', 'राजधानी' आणि 'शताब्दी' या प्रीमियम श्रेणीतील अन्य रेल्वेसेवांमध्ये सुरू करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. यात्री सेवा अनुबंध  या योजनेच्या माध्यमातून वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाण्यापिण्याच्या बाबतीत अधिक पर्याय देण्यासोबतच त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अधिकच्या सुविधा पुरविण्याचा रेल्वेचा उद्देश आहे, असे सांगितले जात आहे.

अशी आहे योजना...

या योजनेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना मूळ आणि गंतव्य स्थानकांवर कॅब बुकिंग, व्हीलचेअर आणि बग्गी ड्राइव्ह यासारखी मदत मिळेल. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनसाठी कंत्राटदाराला संयुक्त परवाना देणे. प्रवाशांना हवे तेवढे अन्नपदार्थ विकत घेण्याची तसेच त्यांच्या विविध पर्यायांची सुविधा देणे. अडकणारे दरवाजे, गळणारे नळ आणि गाडीच्या देखभालीशी संबंधित इतर बाबी, तक्रारींकडे कंत्राटदार लक्ष देणार. सेवा पुरवठादाराला जाहिरातींद्वारे महसूल गोळा करण्याची संधी देणे, अशा काही सुविधा या योजनेतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


 

Web Title: vande bharat express train likely to start from mumbai to jalna and know about indian railway new yatri seva anubandh yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.