Vande Bharat Train: देशातील चौथी 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन', उद्या PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 07:53 PM2022-10-12T19:53:33+5:302022-10-12T20:12:07+5:30
Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशातील चौथ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदिल दाखवणार आहेत.
Vande Barat Express Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशाला चौथी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुपूर्द करणार आहेत. उना ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन मोठी भेट आहे. ट्रेन दिल्लीहून उनासाठी सकाळी 5.50 वाजता सुटेल आणि हरियाणामार्गे सकाळी 8.50 वाजता अंबाला येथे पोहोचेल.
म्हणजेच ट्रेन सकाळी 10:34 वाजता उना रेल्वे स्थानकावर असेल आणि येथे दोन मिनिटे थांबल्यानंतर 11:05 वाजता आंब-अंदौरा येथे पोहोचेल. ही ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. यात 1000 प्रवासी क्षमता असलेले एकूण 16 डबे असतील. ही ट्रेन उना ते दिल्ली हा प्रवास अवघ्या 5 तासात पूर्ण करेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रयत्नातून उना थेट गुजरातशी रेल्वेमार्गे जोडले गेल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबर रोजी उना जिल्ह्यात मुक्काम करणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी सुमारे 7981 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या कार्यक्रमात पंतप्रधान हरोली, उना येथे 1923 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करतील. तर, 5930 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या उना-हमीरपूर रेल्वे मार्गाचा पायाभरणी आणि 128 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ट्रिपल आयटी)चे उद्घाटन होणार आहे.
हिमाचलसाठी मोठी भेट
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. उना ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी भेट आहे. अंबाला विभागाचे रेल्वे व्यवस्थापक गुरविंदर मोहन यांनी सांगितले की, हिमाचलहून दिल्लीला जाताना त्याचे पहिले स्टेशन अंब अंदौरा असेल आणि त्याचप्रमाणे दिल्लीहून ते उनापर्यंत धावेल आणि त्यानंतर शेवटचे स्टेशन अंब अंदौरा असेल.