धक्कादायक! वंदे भारत ट्रेनवर पुन्हा एकदा दगडफेक; 4 खिडक्यांच्या फुटल्या काचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 02:24 PM2023-07-11T14:24:19+5:302023-07-11T14:41:09+5:30
Vande Bharat Train : गोरखपूरहून लखनौला जाणाऱ्या वंदे भारतावर दगडफेक करण्यात आली असून खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.
वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. कर्नाटक, बंगालनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये देखील दगडफेकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरखपूरहून लखनौला जाणाऱ्या वंदे भारतावर दगडफेक करण्यात आली असून खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरहून लखनौला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (22549) ट्रेनवर काही लोकांनी दगडफेक केली. यामध्ये अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. दगडफेकीमुळे कोच क्रमांक C1, C3 आणि एक्झिक्युटिव्ह कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. ट्रेनवर अचानक झालेल्या दगडफेकीमुळे प्रवासी घाबरले आणि डब्यात गोंधळ उडाला. मात्र, यामध्ये एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
7 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर-लखनौ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. गोरखपूर-लखनौ वंदे भारत एक्सप्रेस ही उत्तर प्रदेशात धावणारी दुसरी वंदे भारत ट्रेन आहे. गोरखपूर ते लखनौ हे अंतर 299 किलोमीटर आहे. गोरखपूर-लखनौ वंदे भारत ट्रेन (ट्रेन क्रमांक 22549) गोरखपूरहून सकाळी 06.05 वाजता सुटते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ड्रीट ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, तिकीट दरामुळे या ट्रेन प्रवासाकडे प्रवाशांना पाठही फिरवल्याचे दिसून येत. 2019 मध्ये भारतीय रेल्वेने स्वदेशी बनावटीची हाय स्पीड वंदे भारत ट्रेन सुरू केली. ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीसही उतरली. या ट्रेनचा गतिमान आणि सुरक्षित प्रवास रेल्वे प्रवाशांना भावला आहे. मात्र, जादा तिकीट भाड्यामुळे प्रवाशी नाराज होते. आता, रेल्वे बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून वंदे भारतच्या तिकीट दरात मोठी कपात करण्यात येणार आहे.