Vanshika Pandey : अभिमानास्पद! वंशिका पांडे बनली छत्तीसगडची पहिली महिला लेफ्टनंट; जाणून घ्या, कशी झाली निवड?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 05:57 PM2022-08-02T17:57:33+5:302022-08-02T17:58:21+5:30
Vanshika Pandey : वंशिकाच्या या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही तिचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली : सध्याच्या काळात देशातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. यातच छत्तीसगडच्या वंशिका पांडेचे नाव जोडले गेले आहे. संपूर्ण छत्तीसगडला वंशिकाचा अभिमान वाटत आहे. कारण, वंशिका भारतीय लष्करात लेफ्टनंट बनणारी छत्तीसगडमधील पहिली महिला ठरली आहे. वंशिकाच्या या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही तिचे अभिनंदन केले आहे.
वंशिका पांडे ही छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील रहिवासी आहे. ती लहानपणापासूनच गुणवंत विद्यार्थिनी आहे. राजनांदगाव येथील बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये वंशिकाने इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर तिने युगांतर पब्लिक स्कूलमधून दहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. इंजिनीअरिंगच्या अभ्यासासाठी तिने जबलपूरच्या ज्ञान गंगा इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
इंजिनीअरिंगदरम्यान सैन्यात भरती होण्याचा निर्णय
वंशिका पहिल्यापासून अभ्यासात हुशार होती. भोपाळच्या राजीव गांधी औद्योगिक विद्यापीठात मेरिट लिस्टमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला होता. याशिवाय वंशिकाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये देशभरातून तिसरा क्रमांक पटकावला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना वंशिकाने सांगितले की, तिने जबलपूरमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि तेथे लष्कराचे प्रशिक्षण आहे आणि तेथे गेल्यानंतर तिने काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर तिने लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली.
अशी झाली निवड
एसएसबी परीक्षेत निवड झाल्यानंतर वंशिका ऑफिसर्स ट्रेनिंगसाठी चेन्नईला गेली. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी येथे पार पडलेल्या पासिंग आऊट परेडमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वंशिकाने मोर्च पास केले आहे. लष्करात 11 महिन्यांच्या उच्च प्रशिक्षणानंतर तिला आता लेफ्टनंट पद मिळाले आहे. छत्तीसगडची पहिली महिला लेफ्टनंट होण्याचा मान मिळवणारी वंशिका पांडे जेव्हा आपल्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या अभिनंदनासाठी लोकांची गर्दी झाली होती. दरम्यान, या यशामागे वडील वंशिक अजय पांडे, आई सरला पांडे आणि बहीण मानसी पांडे यांचे पूर्ण सहकार्य लाभले, असे वंशिकाने सांगितले.