चहावाल्याच्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाने खर्च केले 60 लाख, 18 महिने उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 03:45 PM2023-09-21T15:45:22+5:302023-09-21T15:46:13+5:30
मुलीला वाचवण्यासाठी तब्बल 60 लाख रुपयेही खर्च झाले आहेत. याचा परिणाम असा झाला की, मुलीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून, मुलगी महिनाभरानंतर बरी होईल, अशी अपेक्षा आहे.
वाराणसीच्या BHU ट्रॉमा सेंटरमधील एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. बीएचयू रुग्णालयाचे डॉक्टर बिहारमधील एका गरीब चहा विक्रेत्याच्या दहा वर्षांच्या मुलीवर गेल्या 547 दिवसांपासून उपचार करत आहेत, तेही मोफत. मुलीला वाचवण्यासाठी तब्बल 60 लाख रुपयेही खर्च झाले आहेत. याचा परिणाम असा झाला की, मुलीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून, मुलगी महिनाभरानंतर बरी होईल, अशी अपेक्षा आहे.
28 फेब्रुवारी 2022 रोजी प्रिया नावाच्या मुलीला काशी हिंदू विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कारघर येथील प्रिया ही मुलगी शाळेत पडली. त्यामुळे तिच्या मणक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यानंतरही मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अशक्तपणा वाढला आणि चालायला त्रास होऊ लागला.
बिहारमधील सासाराम रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय केल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले. तिला 28 फेब्रुवारी 2022 रोजी ट्रॉमा सेंटर, BHU येथे आणण्यात आले. मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर ही मुलगी सुमारे 8 महिने व्हेंटिलेटरच्या आधारावर होती आणि तिला कोणतीही हालचाल करता येत नव्हती, परंतु डॉक्टरांचे कठोर परिश्रम, उत्कृष्ट उपचार आणि काळजी यामुळे मुलीच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली.
चहा विक्रेता मुन्ना मुलीच्या उपचाराने खूप खूश आहे. मुन्नाच्या म्हणण्यानुसार, ते त्यांच्या मुलीवर दीड वर्षांपासून बीएचयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, परंतु कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही. डॉक्टरांच्या उपचारासोबतच प्रियाला देखील त्यांच्याकडून प्रेम आणि आपुलकी मिळते. रुग्णालयात पैशाअभावी उपचार थांबले नाहीत.
BHU ट्रॉमा सेंटरचे प्रभारी प्रो. सौरभ सिंह यांच्या मते, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाचा बेड, तपासणी आणि उपचार यासह दररोजचा सरासरी खर्च 10,000 रुपये आहे. प्रिया 18 महिन्यांपासून म्हणजेच 547 दिवस व्हेंटिलेटरवर होती. यामध्ये 55 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच प्रियाचे आई-वडील आणि कुटुंबीयांच्या राहण्यासाठी आणि जेवणासाठी देखील 6 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.