Coronavirus : धक्कादायक! दुबईहून दिल्लीत पोहोचला कोरोना पॉझिटिव्ह, ट्रेननं वाराणसीला गेल्यानं एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 08:13 AM2020-03-22T08:13:35+5:302020-03-22T08:14:36+5:30
वाराणसीतील कोरोनाचा असाच एक प्रकार समोर आला आहे. वाराणसीत 30 वर्षीय तरुण कोरोना संक्रमित असल्याचं आढळलं आहे.
लखनऊः कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. भारतात आतापर्यंत 329 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारनंही सतर्कतेची पावलं उचलली आहेत. परंतु अजूनही परदेशातून प्रवास करून आलेले भारतीय निष्काळजीपणा करत असल्याचं समोर आलं आहे. वाराणसीतील कोरोनाचा असाच एक प्रकार समोर आला आहे. वाराणसीत 30 वर्षीय तरुण कोरोना संक्रमित असल्याचं आढळलं आहे. विशेष म्हणजे तो 17 मार्चला दुबईहून विमानाने दिल्लीला पोहोचला आणि 18 मार्च रोजी तो रेल्वेने वाराणसीला आला. तसेच टेम्पोमधून आपल्या गावी गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
घशाला त्रास होत असल्यानं तो 19 मार्चला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात तपासणी करण्याकरिता गेला होता, तिथून त्याचा तपासणी अहवाल बीएचयूला पाठवण्यात आला. आता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. दुबईवरून येऊन वाराणसीत ट्रेनमध्ये तो किती जणांच्या संपर्कात आला हे सांगणं कठीण असलं तरी त्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरड्या खोकल्याशिवाय या आजारात जास्त लक्षणं निदर्शनास येत नसल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. सध्या त्याला दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह या रुग्णावर उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनता कर्फ्यूचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही. बहुतांश विमान उड्डाणे बंद असतील आणि परदेशांतून येणाऱ्या सर्व विमानांना भारतात उतरण्यास शनिवार मध्यरात्रीपासूनच बंदी घालण्यात आली आहे. शिवाय प्रवासी असतील, तरच एसटीच्या बसेस सोडण्यात येतील. कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लोकांनी या कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.