वाराणसीचे काँग्रेस उमेदवार अजय राय संतांच्या चरणी; प्रेमानंद महाराजांनी दिला ‘विजयी मंत्र’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 13:48 IST2024-04-12T13:35:54+5:302024-04-12T13:48:14+5:30
Congress Ajay Rai News: जय-पराजय हे ध्येय असू नये. देशसेवेचे ध्येय ठेवून पुढे जात राहावे. आज नाही तर उद्या विजय नक्की मिळेल, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले.

वाराणसीचे काँग्रेस उमेदवार अजय राय संतांच्या चरणी; प्रेमानंद महाराजांनी दिला ‘विजयी मंत्र’
Congress Ajay Rai News: वाराणसी लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात ०१ जून रोजी मतदान होणार आहे. असे असले तरी येथे उमेदवारांनी प्रचार, बैठका, भेटी-गाठी यांवर भर दिला आहे. वाराणसीत भाजपाकडून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना उमेदवारी दिली असून, इंडिया आघाडीने काँग्रेसच्या अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. अजय राय यांनी संत-महंतांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली असून, प्रेमानंद महाराज यांच्या चरणी अजय राय नतमस्तक झाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अजय राय यांनी वृंदावनमध्ये संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. अजय राय यांनी बाबा विश्वनाथ यांचे स्मृतिचिन्ह देऊन संत प्रेमानंद यांचे आशीर्वाद घेतले. प्रेमानंद महाराजांनी अजय राय यांना विजयाचा मंत्र दिल्याचे सांगितले जात आहे.
प्रेमानंद महाराज नेमके काय म्हणाले?
कोणताही मोह किंवा भीती न बाळगता तुमच्या कर्तव्यात पुढे जावे हाच माझा सिद्धांत आहे. जय-पराजय हे ध्येय असू नये. देशसेवेचे ध्येय ठेवून पुढे जात राहावे. तुमचे कर्तव्य पार पाडताना पुढे जावे. स्वतःला कधीही पराभूत समजू नये. आज नाही तर उद्या विजय नक्की मिळेल, कारण जो कधीही तुटत नाही, दुःखी होत नाही, तो विजय नक्कीच मिळवतो, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले.
दरम्यान, सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार नरेंद्र मोदींनी ६ लाख ७४ हजार ६६४ मते मिळवून मोठा विजय मिळवला होता. तर समाजवादी पक्षाच्या शालिनी यादव यांना ०१ लाख ९५ हजार १५० मते मिळाली होती. काँग्रेसच्या अजय राय यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. असे असले तरी अजय राय यांच्यावरच काँग्रेसने पु्न्हा एकदा विश्वास दाखला आहे. अजय राय यांना इंडिया आघाडीचा पाठिंबा असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतांमधील फरक वाढणार की कमी होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.