Ram Mandir: २२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावा! कोणाकोणाला मिळालं निमंत्रण, जाणून घ्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:06 PM2024-01-20T18:06:32+5:302024-01-20T18:06:54+5:30
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रामललाच्या मूर्तीचा अभिषेक येत्या सोमवारी होणार असून त्याची तयारी जोरात सुरू आहे. प्राणप्रतिष्ठेचा विधी १९ जानेवारीपासून सुरू झाला असून तो २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने घेतली असून त्यात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन आणि पाहुण्यांना आमंत्रित करण्याची जबाबदारी आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी १ हजारहून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विविध खेळातील शिलेदार देखील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व्यतिरिक्त या यादीत रवींद्र जडेजाच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि विद्यमान कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याही नावाचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाला २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. त्यामुळे टीम इंडियातील कोणकोणते खेळाडू उपस्थित राहतात हे पाहण्याजोगे असेल.
२२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावा
विविध खेळातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पीटी उषा, अनिल कुंबळे, कपिल देव, लिएंडर पेस, महेंद्रसिंग धोनी, मिताली राज, हरमनप्रीत कौर, नीरज चोप्रा, पुलेला गोपीचंद, पीव्ही सिंधू, राहुल द्रविड, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, सौरव गांगुली, सुनिल गावस्कर, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, विश्वनाथन आनंद, कर्णम मल्लेश्वरी, कल्याण चौबे, देवेंदा झांजाडाले, बायचुंग भुतिया, बचेंद्री पाल, प्रकाश पादुकोण यांचा समावेश आहे.