पिलिभितच्या लढाईपासून वरुण गांधी चार हात लांब

By गौरीशंकर घाळे | Published: February 21, 2022 05:43 AM2022-02-21T05:43:41+5:302022-02-21T05:44:11+5:30

चारही मतदारसंघांतील राजकीय लढाई तीव्र 

Varun Gandhi is four arms away from the battle of Pilibhit uttar pradesh election 2022 | पिलिभितच्या लढाईपासून वरुण गांधी चार हात लांब

पिलिभितच्या लढाईपासून वरुण गांधी चार हात लांब

Next

गौरीशंकर घाळे

पिलिभित : रामायण आणि महाभारताचे संदर्भ उत्तर प्रदेशात पावलोपावली मिळत जातात. राजधानी लखनऊला खेटून असलेल्या उन्नाव जिल्ह्याला रामायणाचा संदर्भ आहे. तर, उत्तरेचे पिलिभित श्रीकृष्णाच्या बासरीसाठी प्रसिद्ध आहे. याच पिलिभितमधून एकेकाळी वरूण गांधी यांनी हिंदुत्वाचा राग आळवला होता. पण, सध्याच्या भाजप नेतृत्वाशी त्यांचे सूर फारसे जुळत नाहीत. पिलिभितमधील चारही विधानसभा मतदारसंघातील राजकीय लढाई तीव्र झाली असताना खासदार असलेले वरूण गांधी मात्र सध्या गायब आहेत. 

पिलिभित जिल्ह्यातील चारही जागा २०१७ साली भाजपच्या खात्यात जमा झाल्या. पिलिभित, बरखेडा, पुरनपूर आणि बिसलपूर हे ते चार मतदारसंघ. यावेळी इथली राजकीय लढाई तीव्र बनली आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांनी इथे प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या सभा झाल्या. तर, जिल्ह्याच्या राजकारणाची नस ओळखून असलेले केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच इथे फेऱ्या वाढवल्या होत्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांची सभा आणि पाठोपाठ रोड शो असणार आहे. दुसरीकडे, भाजपचा गड भेदण्यासाठी सपाचे अखिलेश यादवही पिलिभितची वारी करून गेले आहेत. भाजप आणि समाजवादीने चारही जागांवर सगळा जोर लावला आहे. 

पिलिभत विधानसभेचा शहरी भाग वगळता इतर तीन मतदारसंघांचा तोंडवळा ग्रामीण आहे. या भागातून शेतकरी आंदोलनाला चांगलाच पाठिंबा मिळाला होता. जोडीला मोकाट जनावरांची समस्याही स्थानिकांची डोकेदुखी बनली आहे. पण, त्यामुळे वातावरण थेट भाजपच्या विरोधात गेले, असे मात्र नाही. शेतकरी, कामगार वर्गासाठी राज्य सरकारची पेन्शन योजना आणि राशन वितरण भाजपची जमेची बाजू बनली आहे. स्वतः मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही राज्याच्या योजनांसह केंद्रीय योजनांच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची जंत्री मांडली होती. सपाचा वाढत्या प्रभावाला लाभार्थीच बांध घालतील अशी भाजपला आशा आहे.

सपाचे होते वर्चस्व  
या मतदारसंघातून २०१७ पूर्वी सपाचे नेते आणि माजी मंत्री रियाज अहमद तीनवेळा आमदार होते. त्या काळातील सपाचे वर्चस्व पुन्हा नको, असाही एक अंतरप्रवाह जिल्ह्यातून वाहतो आहे. रियाज आज या जगात नाहीत, त्यांचा मुलगा बसपाच्या तिकिटावरून लढतो आहे. तरीही उलटा परिणाम सपाला त्रासदायक बनतो आहे.

Web Title: Varun Gandhi is four arms away from the battle of Pilibhit uttar pradesh election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.