१०५ वर्षांच्या वृद्धानं मरणाच्या ठिक ३० मिनिटं आधी पूर्ण केली आपली शेवटची इच्छा, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:53 AM2022-05-16T11:53:16+5:302022-05-16T12:04:22+5:30
झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला.
चौपारण, हजारीबाग-
झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला. वरुण साहू यांचे त्यांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा म्हणजेच मतदानाच्या अर्ध्या तासानंतर घरीच निधन झाले. एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापूर्वी वरुण साहू यांनी पंचायत निवडणुकीत मतदान केले. त्यानंतर त्यांनी घरी येऊन अखेरचा श्वास घेतला. मतदान करण्याची आपली शेवटची इच्छा असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना आधीच सांगितले होतं, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गजाधर प्रसाद यांनी दिली.
105 वर्षीय वरुण साहू यांनी बेलाही पंचायतीच्या बूथ क्रमांक 256 वर मतदान केलं त्यानंतर घरी परतल्यावर दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूपूर्वी ते म्हणाले की, ''मी भाग्यवान आहे की या वयातही मी लोकशाहीत माझा सहभाग सुनिश्चित करू शकलो". आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वरुण साहू यांनी मतदान करून लोकांमध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं काम केलं आहे. वरुण यांच्या पश्चात दोन मुलांसह संपूर्ण कुटुंब आहे. त्यांच्या दोन्ही मुलांचा मुंबईत भाजीचा व्यवसाय आहे. वरुण साहू यांनी त्यांच्या घरी सांगितलं होतं की, माझी शेवटची इच्छा आहे की मला मतदानासाठी जाता यावं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या आग्रहापुढे नमतं घेत त्यांना गाडीवर बसवून मतदान करण्यासाठी नेलं होतं.
वरुण साहू बराच काळ आजारी होते, पण तरीही त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाल्यावरच त्यांनी प्राण सोडले. यावरुनच लोकशाहीबद्दलची त्यांची जिद्द आणि परिभाषा लक्षात येते. शनिवारी सकाळपासूनच वरुण यांनी मतदानाला जाण्याचा हट्ट धरला होता. यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही मुलंही होती. अखेर त्यांचा आग्रह पाहून वरुण यांना दुपारी २.४५ वाजता मतदान केंद्रावर नेण्यात आलं. यावेळी त्यांनी कारमध्ये बसून मतदान केलं. यानंतर ते घरी परतले आणि अर्ध्या तासात त्यांनी जगाचा निरोप घेतला.