वसुंधरा राजे आणि सचिन पायलट यांना तगडे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 05:21 AM2018-11-24T05:21:05+5:302018-11-24T05:21:46+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार सचिन पायलट यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यास भाजपाने मंत्री युनूस खान यांना उतरवले आहे.
- सुहास शेलार
जयपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार सचिन पायलट यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यास भाजपाने मंत्री युनूस खान यांना उतरवले आहे. काँग्रेसने वसुंधरा राजे यांच्याविरुद्ध भाजपाचे बंडखोर मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिल्याने याचा वचपा काढण्यास भाजपाने ही खेळी खेळली आहे. त्यामुळे टोंक व झालरापाटण येथील चुरशीकडे अवघ्या राजस्थानचे लक्ष लागले आहे.
गुर्जर नेते अशी प्रतिमा घेऊन वोट बँक सांभाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पायलट यांनी ‘सेफ’ झोन म्हणून टोंक मतदार संघाची निवड केली. येथे
२ लाख २२ हजार मतदार असून, ५० ते ६० हजार मुस्लीम, २० ते ३० हजार गुर्जर, ३५ हजार अनुसुचित जाती व १५ हजार माळी समाजाचे मतदार आहेत. मुस्लीम मते कोणाकडे वळतात,
यावर येथील निकाल अवलंबून आहे. मात्र येथील राजघराण्याने पायलट यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
टोंकचे नवाब अफ्ताब अली खान पायलट यांना पाठिंबा देताना म्हटले की, देशाचे भवितव्य तरुणांचा हाती आहे व पायलट यांच्या रूपाने आपल्याला तरुण नेतृत्व मिळत आहे. येथून गेल्या वेळी भाजपाचा हिंदू उमेदवार विजयी झाला होता.
एकमेव मुस्लीम चेहरा
‘सबका साथ, सबका विकास’ अशी घोषणा करणाºया भाजपाने राजस्थानात एकच मुस्लीम उमेदवार उभा केला. काँग्रेसने १५ मुस्लीम उमेदवार दिले आहेत. यात ३ महिला आहेत. भाजपाने २०१३मध्ये ४ मुस्लीम चेहºयांना संधी दिली होती. यातील युनूस खान आणि हबीब-उर-रेहमान या दोघांनी विजय मिळविला होता. पैकी हबीब-उर-रेहमान यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना नागौरमधून उमेदवारी दिली.
मुख्यमंत्र्यांना बिझी ठेवण्याचा प्रयत्न?
झालरापाटन मतदारसंघातून मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना बिझी ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. मानवेंद्र सिंह यांच्या रुपाने पहिल्यांदाच राजेंसमार तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा ठाकला आहे. त्यामुळे बुथस्तरावरील प्रचारात आघाडी घेण्यासाठी स्वत: वसुंधरा राजे यांना मैदानात उतरावे लागणार आहे. अशा वेळी मतदारसंघ सोडून राजे फार काळ इतर ठिकाणी लक्ष देऊ शकलेल्या नाहीत.