वसुंधरा राजे सरकारने मोदींसाठी केली 'पद्म'ची शिफारस
By Admin | Published: July 8, 2015 09:06 AM2015-07-08T09:06:06+5:302015-07-08T12:26:33+5:30
राजस्थान क्रीडा परिषदेने ललित मोदींना 'पद्म' पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. ८ - आयपीएलचे माजी कमिशनर व ईडीकडून समन्स बजावण्यात आलेले ललित मोदी यांना 'पद्म' पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००७ साली राजस्थान क्रीडा परिषदेने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून मोदींना 'पद्म' पुरस्कार देण्याची शिफारस केल्याचे उघड झाले आहे. 'खेळ व क्रिकेटच्या विकासासाठी मोदींनी केलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे' असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यावेळी राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सत्तेत होते. ललित मोदींशी असलेल्या कथित मैत्रीपूर्ण संबंधांवरून वसुंधरा राजे आधीच अडचणीत सापडलेल्या असताना आलेल्या या बातमीमुळे त्यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मोदींसाठी करण्यात आलेल्या 'पद्म' पुरस्काराच्या शिफारसीसाठी पत्रात दोन उपायही सुचवण्यात आले होते. पहिल्या पर्यायात फक्त मोदींचीच शिफारस करण्यात आली होती, तर दुसरा पर्यायात आंतरराष्ट्रीय तिरंदाज लिंबा राम यांच्यासोबत मोदींचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र या दोघांनाही हा पुरस्कार मिळाला नव्हता.