'वसुंधरा राजे यांच्या मुलाने आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवले', भाजप आमदाराच्या वडिलांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 05:00 PM2023-12-07T17:00:47+5:302023-12-07T17:01:47+5:30
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन दोन दिवस उलटले तरीही अजून मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याचे नाव समोर आलेले नाही.
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊन दोन दिवस झाले. भाजपने पूर्ण बहुमत घेतले आहे, पण अजुनही मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार या नावाची चर्चा समोर आलेले नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधराराजे यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समोर आले आहे. काल ६० आमदारांची बैठक घेऊन आज दिल्लीसाठी गेले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधराराजे दावा सांगू शकतात.
रेवंत रेड्डी, तुमचं अभिनंदन आणि मी आश्वस्त करतो की...; पंतप्रधान मोदींनी दिला शब्द!
मुख्यमंत्री पदावरुन सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, आता 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा मुद्दा समोर आला आहे. आता भाजप आमदार ललित मीणा यांचे वडील आणि माजी आमदार हेमराज मीणा यांनी मोठा आरोप केला आहे. हेमराज मीणा यांचे म्हणणे आहे की, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह यांनी आमदारांना राजस्थानमधील रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. वसुंधरा राजे सध्या दिल्लीत आहेत. येथे त्यांना जेपी नड्डा यांना भेटायचे आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
माजी आमदारांनी केले आरोप
वसुंधरा राजे यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह यांच्यावर किशनगंजचे आमदार ललित मीणा यांचे वडील आणि माजी आमदार हेमराज मीणा यांनी हा आरोप केला आहे. दुष्यंत सिंह यांनी भाजप आमदारांना 'अपनो राजस्थान' रिसॉर्टमध्ये ठेवले होते. दाव्यानुसार झालावाडमधील तीन आणि बारणे येथील तीन आमदारांना तिथे ठेवण्यात आले होते. हेमराज मीना म्हणाले, 'मला जेव्हा कळले तेव्हा मी माझ्या मुलाला आणायला गेलो होतो. तेथे आमदार कंवरलाल म्हणाले की, तुम्ही दुष्यंत सिंह यांच्याशी बोलाल तर ते तुम्हाला घेऊन जाऊ दे. मग ते भांडू लागले. त्यानंतर आम्ही राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह, भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि संघटनेचे सरचिटणीस चंद्रशेखर यांना कळवले, असा आरोप त्यांनी केला.
हेमराज मीणा यांचा दावा आहे की, यानंतर हे सर्व लोक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. मग आमदार आणि त्यांचा मुलगा ललित मीणा यांना आणण्यात यश आले. उर्वरित ४ आमदारांना वसुंधरा राजे यांच्या गटाने दुसरीकडे हलवले असल्याचे बोलले जात आहे.
निकालानंतर वसुंधरा राजे' यांचे प्रेशर पॉलिटिक्स'
राजस्थानमध्ये भाजपच्या विजयानंतर वसुंधरा राजे 'प्रेशर पॉलिटिक्स' करताना दिसत आहेत. डिनरवर त्यांनी २० हून अधिक आमदारांची भेट घेतली. यानंतर वसुंधरा राजे यांच्या गटाने दावा केला होता की, त्यांना ६८ आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय काही अपक्षही त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला जात होता. त्यासाठी वसुंधरा गट आपली ताकद दाखवत होता. मात्र, बुधवारी आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर वसुंधरा यांनी भाजप हायकमांडशी फोनवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तसेच यानंतर वसुंधरा राजे यांमी आपण पक्षाची शिस्तबद्ध कार्यकर्ता असून कधीही पक्षाच्या बाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर आज वसुंधरा राजे दिल्लीत नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी गेल्या आहेत.