वसुंधराराजेंच्या भवितव्याचा आज फैसला; १५९ नावांचा होईल निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 06:18 AM2023-10-15T06:18:18+5:302023-10-15T06:18:43+5:30

वसुंधराराजे सिंधिया यांना रिंगणात उतरवल्यास त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनाही निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते.

Vasundhara Raj's fate decided today; 159 names will be decided, Rajasthan Politics Assembly Election | वसुंधराराजेंच्या भवितव्याचा आज फैसला; १५९ नावांचा होईल निर्णय

वसुंधराराजेंच्या भवितव्याचा आज फैसला; १५९ नावांचा होईल निर्णय

- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजस्थान भाजपमधील तिकीट वाटपातील सस्पेन्स कायम असून, राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. रविवारी सायंकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, २०० पैकी उर्वरित १५९ विधानसभा मतदारसंघांतील तिकिटे निश्चित केली जाणार आहेत. पक्षाने ४१ जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. यात लोकसभेचे सहा खासदार आणि एका राज्यसभा सदस्याचा समावेश आहे. 

वसुंधराराजे सिंधिया यांना रिंगणात उतरवल्यास त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनाही निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने कोणताही धोका पत्करावा लागू नये म्हणून वरिष्ठांना विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.

२०० जागांची चार श्रेणींमध्ये विभागणी 
पक्षाच्या एका सरचिटणीसांनी सांगितले की, २०० जागा चार श्रेणींमध्ये विभागल्या गेल्या आहेत. अ श्रेणीमध्ये अशा जागांचा समावेश होतो, जेथे पक्षाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तर ब श्रेणीमध्ये अशा जागांचा समावेश होतो, जेथे भाजपचा विजय आणि पराभवाचा संमिश्र इतिहास आहे. सी श्रेणीमध्ये अशा जागांचा समावेश होतो, जेथे पक्ष तुलनेने कमकुवत असल्याचे मानले जाते. या उलट श्रेणी डच्या जागांवर गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपचा सतत पराभव झाला आहे. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय गुणवत्तेवरच घेतला जाईल.

पितृपक्ष संपताच वाढणार हालचाली 
अशुभ मानला जाणारा पितृपंधरवडा संपताच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगढ आणि मिझोराममध्ये या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या हालचालींना उद्यापासून वेग येणार आहे. या निवडणुकांमधील मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि भाजप आपापल्या उमेदवारांची नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे, तर तेलंगणमध्ये सत्ताधारी भारत राष्ट्रसमिती उद्या निवडणूक जाहीरनाम्याची घोषणा करणार आहे.
काँग्रेसने २०१८ साली छत्तीसगढ विधानसभेत ९० पैकी ६८ जागा जिंकून पंधरा वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार यंदा छत्तीसगढ काँग्रेसच्या १५ ते २० विद्यमान आमदारांवर  टांगती तलवार आहे. मध्य प्रदेश आणि तेलंगणच्या उमेदवार निवडीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकी पूर्ण झाल्या असून, नावांची घोषणा उद्यापासून होण्याची शक्यता आहे. 


२२ खोक्यात ४२ कोटी; बीआरएसकडून आरोप
बंगळुरू : येथील काँग्रेसच्या माजी नगरसेविका अश्वत्थम्मा, त्यांचे पती आर. अंबिकापती, मुलगी यांच्या घरातून ४२ कोटी रुपयांची रोकड आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील ही रक्कम भरलेले २२ खोके त्या घरातील पलंगाखाली दडवून ठेवले होते. हा काँग्रेसचा पैसा असून तो तेलंगणातील निवडणुकांसाठी हैदराबाद येथे नेणार होते, असा आरोप बीआरएस नेते हरीश राव यांनी केला. 
 

Web Title: Vasundhara Raj's fate decided today; 159 names will be decided, Rajasthan Politics Assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.