Petrol-Diesel Price: केंद्रापाठोपाठ भाजपाशासित ६ राज्यात व्हॅटमध्ये कपात; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 08:47 AM2021-11-04T08:47:04+5:302021-11-04T08:47:50+5:30
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साइज ड्यूटीत कपात केल्यानंतर एका पाठोपाठ एक भाजपाशासित राज्यात व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे
नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेला एक्साइज करात कपात करत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रानं डिझेलवर १० रुपये आणि पेट्रोलमध्ये ५ रुपये कर कपात केल्यानं पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या दराने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले होते. त्यात पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केंद्र सरकारनं लोकांना थोड्या प्रमाणात दिलासा दिला आहे. आता केंद्र सरकारपाठोपाठ भाजपाशासित ६ राज्यातही इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे.
या भाजपाशासित राज्यात व्हॅटमध्ये कपात
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी दिवाळीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ७ रुपये कपात करण्याची घोषणा केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटमध्ये तात्काळ ७ रुपये कपात करण्याची घोषणा केली.
गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोवा सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील ७ रुपये कर कमी करेल. त्यामुळे गोव्यात डिझेलच्या किंमतीत १७ रुपये प्रति लीटर आणि पेट्रोलच्या दरात १२ रुपये प्रति लीटर कपात होईल.
कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लीटर ७ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्यात पेट्रोलचे दर ९५.५० आणि डिझेल ८१.५० रुपये प्रति लीटर असतील.
उत्तराखंड सरकारने पेट्रोलच्या दरात २ रुपये प्रति लीटर अतिरिक्त कपात करण्याची घोषणा केली आहे.
मणिपूर सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ७ रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं कौतुक करत राज्यातील जनतेला इंधनावरील व्हॅट कपात करून लवकरच अधिसूचना काढली जाईल अशी घोषणा केली आहे.
विरोधी पक्षाच्या सरकारसाठी आव्हान
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साइज ड्यूटीत कपात केल्यानंतर एका पाठोपाठ एक भाजपाशासित राज्यात व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबाला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे भाजपाविरोधी सरकार असलेल्या राज्यात व्हॅट कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यात केंद्राने इंधनावरील कर कपात केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार व्हॅटमध्ये कपात करून राज्यातील जनतेला दिलासा देणार का? हा प्रश्न उभा राहतो.