सुवर्ण मंदिरालाही हवा व्हॅटिकनसारखा दर्जा, कट्टर शिखांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:38 AM2018-02-28T00:38:31+5:302018-02-28T00:38:31+5:30
अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात १९८४ मध्ये झालेल्या लष्करी कारवाईबद्दल जागतिक व्यासपीठावर पंतप्रधानांनी माफी मागणे व्हॅटिकनच्या धर्तीवर
नवी दिल्ली : अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात १९८४ मध्ये झालेल्या लष्करी कारवाईबद्दल जागतिक व्यासपीठावर पंतप्रधानांनी माफी मागणे व्हॅटिकनच्या धर्तीवर अकाल तख्त आणि हरमिंदर साहिबला विशेष दर्जा बहाल करण्यासह ३ मुख्य मागण्या इतर देशांत असलेल्या मूलतत्ववादी शीख गटांनी केल्या आहेत. या गटांची सरकारशी गुप्त बोलणी सुरू आहे.
या घडामोडींशी संबंध असलेल्या २ जणांपैकी एकाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये लंडनला भेट देण्याच्या आधी लंडनस्थित संवादक व शिख मानवी हक्क सभेचे संचालक जसदेव सिंग राय यांच्यामार्फत इंग्लडमधील शीख गटांशी प्रारंभी संपर्क निर्माण करण्यात आला आणि राय आणि इतर ३० शिख नेत्यांनी मोदी यांची त्यांच्या त्या दौºयात भेट घेतली. औपचारिक बोलणी सुरू झाली. बोलणी करण्यास भारत सरकार आधीही उत्सुक होते, परंतु मोदी सरकार आल्यानंतर त्याने वेग घेतला, असे दुसºया नेत्याने सांगितले.
संपर्कानंतर शीख गटांनी २ प्राथमिक पावले टाकली आणि ३ मुख्य मुद्दे चर्चेसाठी मांडले, असे एकाने सांगितले.
परदेशात असलेल्या ज्या मूलतत्ववादी शीख कार्यकर्त्यांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे ती उठवावी आणि २० राजकीय कार्यकर्त्यांची सुटका करावी, अशी दोन पावले सुरुवातीला टाकावीत, अशी मागणी आहे. राय यांनी जे दोन महत्त्वाचे मुद्दे भारताकडे उपस्थित केले आहेत, त्यात भारताच्या पंंतप्रधानांनी आॅपरेशन ब्लूस्टारसाठी जगभरातील शिखांची माफी मागावी, हा एक आहे.
सुवर्ण मंदिरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी जून १९८४ मध्ये करण्यात आलेल्या लष्करी कारवाईत ५०० पेक्षा जास्त जण ठार झाले होते.
अकाली तख्तचे श्रेष्ठत्व मान्य करा-
इतर मागण्यांत अकाल तख्त आणि हरमिंदर साहिबचे श्रेष्ठत्व सरकारने मान्य करायचे आहे. व्हॅटिकनला जो विशेष दर्जा आहे, तसाच दर्जा अकाल तख्त आणि हरमिंदरसाहिबला हवा आहे. आॅपरेशन ब्लूस्टारमुळे झालेल्या शीखविरोधी दंगली आणि न्यायव्यवस्थेबाहेरील हत्यांसह इतर प्रश्नांवर सरकार खुली चर्चा करण्यास तयार असेल, असे या दोघांनी सांगितले. मात्र, विदेशांतील शिखांच्या काही संघटना खलिस्तानचे उघड समर्थन करणाºया आहेत. त्यांच्यापैकी काही जणही याच प्रकारची पुन्हा-पुन्हा मागणी करीत असतात.