भाजीपाला निर्यातीत दीड हजार टनाची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 04:40 AM2019-10-13T04:40:51+5:302019-10-13T04:40:59+5:30
पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातून यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक ...
पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातून यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक हजार टनांनी वाढ झाली आहे. त्यातून ४९.४७ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.
राज्यातील फळे व भाजीपाल्यास देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पणन मंडळाच्या मार्फत ४४ सुविधा केंदे्र उभारली आहेत. त्या माध्यमातून द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, कांदा, भेंडी, कारले, शेवगा, तोंडली, मिरची यासारख्या भाजीपाल्याची निर्यात करण्यात आली. निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी संस्था, बाजार समित्या, वैयक्तीक शेतकऱ्यांच्या मार्फत ही सुविधा केंद्र चालविली जातात. काही निर्यात केंद्रे पणन मंडळ स्वत: संचालित करते. एप्रिल ते जून २०१८च्या तुलनेत एप्रिल ते जून २०१९ मध्ये तब्बल १५१५.६ टन जादा शेतमालाची निर्यात झाली आहे.
अमेरिका, जपान, कॅनडा, जर्मनी, युरोपीयन देश, नेदरलँड, रशिया, थायलंड, कॅनडा, न्यूझीलंड, इंग्लंड, सिंगापूर, चीन, नेपाळ, इराण आणि दुबई या देशांना शेतमाल निर्यात करण्यात आला. त्यात आंबा, द्राक्ष, डाळिंब, केळी, भाजीपाला, फळे, गुलाब फुले, पशुखाद्य आणि कांद्याचा समावेश आहे. तर, परराज्यात बटाटा, गुलाब फुले, कांदा, केळी, डाळिंब, आंबा, कारले, मिरची, दोडका, भेंडी, पालक, हळद अशा विविध प्रकारच्या शेतमालांची विक्री केली आहे. राज्यांतर्गत बाजारपेठेत प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे, दिल्ली, सांगली, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेतमाल पाठविण्यात येतो.
शेतकरी झाले निर्यातदार
पणन मंडळामार्फत निर्यातपूरक उपक्रमांमधे वाढ व्हावी व युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यावसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ‘हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्स’ डिसेंबर २०१५पासून सुरु करण्यात आला आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी, सहकारी संस्था प्रतिनिधी, नवीन उद्योजक यांना निर्यातविषयक प्रशिक्षण दिले जाते. आजतागायत ४६ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून १ हजार १०३ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात आले असून, त्यातील १०५ जणांनी प्रत्यक्ष निर्यात सुरू केली आहे. तर, १८० प्रशिक्षणार्थींनी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांच्या माध्यमातून कृषी उत्पादनाच्या पुरवठा
साखळीची जबाबदारी पार पाडत आहेत.