भाजी विक्रेत्या बापाची लेक जिंकली, एअरो इंजिनिअरिंग परीक्षेत राज्यात पहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 02:45 PM2020-02-10T14:45:39+5:302020-02-10T14:47:04+5:30
हरियारमधील नेहरू मार्केट येथे लिलताचे आई-वडिल भाजी विक्रीचा व्यवसाय करतात
बंगळुरू - भाजीपाला विक्रेत्याच्या मुलीने एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. आपल्या हुशार लेकीच्या या यशाने ललिथाच्या आई-वडिलांनी अत्यानंद झाला आहे. मी माझ्या कुटुंबात पहिली पदवीधर व्यक्ती असून इस्रोचे प्रमुख के सिवन यांना मी आयडॉल मानत असल्याचे लिलताने म्हटलंय.
हरियारमधील नेहरू मार्केट येथे लिलताचे आई-वडिल भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. पहाटे उठून 4 वाजताच वडिलांच्या भाजीच्या स्टॉलवर जावे लागत. त्यामुळे, माझ्या अभ्यासाची पुस्तके घेऊन भाजी स्टॉलवर जात. त्यानंतर, बंळळुरूच्या येलांहका येथील ईस्ट वेस्ट इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जात. याच कॉलेजमधून ललिथाने एरोनॉटिकल विभागातून आपले बीई इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या वडिलांना मदत करत ती आपल्या पंखांना शिक्षणाच्या माध्यमातून उडवण्यासाठी बळ देत होती. अखेर, 1 फेब्रुवारी 2020 रोजी तिच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला अन् ती जिंकली.
ललिताने एरोनॉटिकल अभियांत्रिकीमध्ये 9.7 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे गेट परीक्षेत तिने 707 गुण मिळवले आहेत. नुकतेच 8 फेब्रुवारी रोजी विश्वैश्वरेय्या टेक्निकल विद्यापीठातून तिचा राज्यातील टॉपर म्हणून गोल्ड मेडलने गौरव करण्यात आला. लाडक्या मुलीचे हे यश आणि कौतुकसोहळा पाहून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले, त्यांना अत्यानंद झाल्याचं लिलताने सांगितले. विशेष म्हणजे ललिता ही तिच्या कुटुंबातील पहिली पदवीधर असून कदाचित जिल्ह्यातील पहिली महिला इंजिनिअरही असल्याचं तिचं म्हणणं आहे. म्हणूनच, ललिताने तिच्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडिलांना दिलंय.
ललिता आता आयआयटी किंवा आयआयएममधून आपलं इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणार आहे. भविष्यात इस्रो संस्थेत स्पेस वैज्ञानिक म्हणून काम करण्याचं स्वप्न ललिताने बाळगलं आहे.