भाज्या, दुधात कीटकनाशके
By admin | Published: October 3, 2015 03:56 AM2015-10-03T03:56:32+5:302015-10-03T03:56:32+5:30
सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे.
नवी दिल्ली : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सेवन होणाऱ्या भाज्या, फळे, दूध या आणि अशा काही महत्त्वाच्या पदार्थांत शरीरास घातक ठरेल अशा मात्रेत कीटकनाशके असल्याचे सरकारी तपासणीतच आढळून आले आहे. तपासणी झालेल्या २०,६१८ नमुन्यांपैकी १२.५ टक्के नमुन्यांत कीटकनाशकांचे प्रमाण घातक पातळीवर असल्याचे उघड झाले आहे.
खाद्यपदार्थांच्या निर्मिती व उत्पादनात आरोग्यवर्धक घटकांची मात्रा, रसायने अथवा कीटकनाशके यांची मात्र तपासण्यासाठी २००५ पासून सरकारतर्फे विविध खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होत आहे. या तपासणीकरिता देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून सरसकट भाज्या, फळे, कडधान्ये, दूध व अन्य खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले जातात व देशभरातील २५ प्रयोगशाळांतून या पदार्थांचा दर्जा व त्यातील रसायने यांची तपासणी केली जाते. त्यावेळी या पदार्थांत कीटकनाशकांची मात्रा अधिक असल्याचे आढळून आले.
जमा केलेल्या भाज्यांच्या ११८०, फळांच्या २२५, मसाल्याच्या ७३२, तांदळाच्या ३०, डाळीच्या ४३ नमुन्यांत अशी धोकादायक कीटकनाशके सापडली. भाज्यांमध्ये अॅसिफेट, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ ही कीटकनाशके सापडली. फळांमध्ये अॅसिफेट, अॅसिटामीप्रेड, कार्बो सल्फान, सायपरमेथ्रीन, प्रोफेनोफेस आदी सापडले.
बंदी असलेल्या अनेक कीटकनाशकांचाही वापर असल्याचे दिसून आले आहे. या नमुन्यात अॅसिफेट, बाइफ्रेंथिन, अॅसिटामीप्रेड, ट्रायोजोसेफ, मॅटेलोक्लीझ, मेलेथियन, कार्बो सल्फान, प्रोफेनोफेस, एक्साकोनाजेन आदींचे अंश सापडले. या रसायनांची अतिरिक्त मात्रा शरीरासाठी हानिकारक आहे. तर कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे, की सुमारे ५४३ नमुन्यांत २.६ टक्क्यांच्या विहित मर्यादेपेक्षा कित्येक पटीने कीटकनाशकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.