वाहन परवाना जनधन योजनेशी जोडणार
By admin | Published: January 11, 2016 03:15 AM2016-01-11T03:15:43+5:302016-01-11T03:15:43+5:30
सध्याची वाहनचालकांना परवाने (ड्रायव्हिंग लायसन्स) देण्याची प्रक्रिया आमूलाग्र बदलली जाणार असून, ती अधिक तर्कसंगत करताना जनधन योजनेशी जोडली जाणार असल्याचे
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
सध्याची वाहनचालकांना परवाने (ड्रायव्हिंग लायसन्स) देण्याची प्रक्रिया आमूलाग्र बदलली जाणार असून, ती अधिक तर्कसंगत करताना जनधन योजनेशी जोडली जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नव्या यंत्रणेत डिजिटल तंत्रज्ञानावर तसेच खासगी सहभागावर भर दिला जाणार आहे. बनावट परवान्यांच्या समस्येवर पूर्णपणे मात करण्याचा त्यामागे उद्देश आहे. अर्जदाराला परवाना चाचणी स्वत: उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. पूर्णपणे संगणकीय पद्धतीत चुकीला कोणताही वाव नसेल.
वाहनचालकाच्या चुकीमुळे प्रत्येक मिनिटाला एक व्यक्ती रस्ते अपघाताला बळी पडते. अशा अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी परवाने जारी करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला जात आहे. नव्या व्यवस्थेत वाहन चालविण्याची चाचणी आणि परवाने रद्द करण्याचे काम वेगवेगळ्या संस्थेकडे दिले जाईल. त्यासाठी खासगी सहभागातून केंद्रे उघडली जातील. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना परीक्षा द्यावी लागेल.
संगणकीय पद्धतीने होणाऱ्या परीक्षेच्या वेळी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तपासणी केली जाईल. आधीच निश्चित केलेल्या मापदंडानुसार परीक्षार्र्थींची चाचणी तपासून निकषानुसारच उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ठरविले जाईल. डाटा अधिकृत प्राधिकरणाकडे पाठवल्यानंतर ठरावीक मुदतीत उमेदवाराला परवाना मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.