अन् कचऱ्यात फेकलेल्या लॉटरीच्या तिकिटानं त्याला बनवलं करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:14 AM2020-01-06T11:14:45+5:302020-01-06T11:20:23+5:30
कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही.
कोलकाता - कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथे घडली आहे. कचऱ्यामध्ये फेकलेल्या लॉटरीच्या तिकिटाने एका भाजी विक्रेत्याला करोडपती केले आहे. भाजी विक्रेत्याने नववर्षाच्या निमित्ताने लॉटरीचं तिकीट काढल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सादिक असं भाजी विक्रेत्याचं नाव असून कोलकातामध्ये राहतो. सादिकने आपली पत्नी अमीनासह नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लॉटरीची पाच तिकिटं खरेदी केली होती. 2 जानेवारी रोजी लॉटरीच्या बक्षिसांची घोषणा झाली. मात्र त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर भाजी विक्रेत्यांनी त्याला बक्षिस मिळालं नसल्याचं सांगितलं. त्यामुळेच निराश झालेल्या सादिकने लॉटरीची तिकिटं कचऱ्याच्या डब्यात फेकली. दुसऱ्या दिवशी तो काही सामान घेण्यासाठी बाजारात पोहोचला तेव्हा लॉटरी विकणाऱ्या दुकनदाराने लॉटरीच्या तिकिटांबाबत सादिककडे चौकशी केली.
दुकानदाराने सादिकला एक करोडची लॉटरी लागल्याची माहिती दिली. लॉटरी लागल्यामुळे आनंदात असलेल्या सादिकने घरी येऊन अमीनाला याबाबत सांगितले. मात्र लॉटरीची तिकिटं ही कचऱ्यात फेकून दिल्यामुळे त्यांनी लगेचच कचऱ्यामध्ये तिकिटं शोधण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान फेकलेली तिकिटं शोधण्यात त्यांना यश आलं. पाच तिकिटांपैकी एका तिकिटावर एक करोड तर इतर तिकिटांवर 1-1 लाखांची लॉटरी लागली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लॉटरी लागल्यामुळे सादिकच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लॉटरीमुळे आमचं आयुष्य बदललं आहे. सादिकने आपल्या मुलांसाठी एक एसयूवी बूक केली आहे. तसेच मुलाच्या शिक्षणासाठी पैशाचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती सादिकची पत्नी अमीनाने दिली आहे. जिंकलेल्या लॉटरीची रक्कम पुढच्या दोन ते तीन महिन्यांत सादिक आणि अमीनाला मिळेल अशी माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
JNU Violence : जेएनयूमध्ये हिंसाचार; मोदींच्या मंत्र्यांसह विरोधकांकडून हल्ल्याचा निषेध
JNU Violence : 'जेएनयू' हल्ल्याचे देशभरात पडसाद; मुंबई, पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने
जेएनयू हाणामारीत एका शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी