...आणि काँग्रेसमधील 'या' नेत्याच्या आठवणीने उपराष्ट्रपती गहिवरले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 07:14 PM2019-07-29T19:14:14+5:302019-07-29T19:14:33+5:30
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज राज्यसभेमध्ये भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
नवी दिल्ली - संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये आज माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रेड्डी यांच्या स्मृतींना उजाळा देताना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे भावूक झाले. जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी 28 जुलै रोजी निधन झाले होते.
सोमवारी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहून सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळले. त्यावेळी जुने मित्र असलेल्या रेड्डी यांना श्रद्धांजली वाहताना उपराष्ट्रपतींना गहिवरून आले. ''रेड्डी यांचे जाणे माझ्यासाठी खूप वेदनादायी आहे. त्यांनी केंद्रातील विविध मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणीन काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक ज्येष्ठ खासदार, एक प्रभावी वक्ता आणि एक कुशल प्रशासक गमावला आहे.'' असे नायडूंनी सांगितले.
यावेळी व्यंकय्या नायडू यांनी जयपाल रेड्डी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक स्नेहसंबंधांचाही उल्लेख केला. ''रेड्डी माझे मित्र, ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शक होते. आंध्र प्रदेश विधानसभेचे आमदार असताना आम्ही दोघेही एकाच बेंचवर बसत असू. त्यावेळी विधानसभेचे कामकाज सकाळी 8 वाजता सुरू होत असे. तेव्हा मी आणि रेड्डी सकाळी सात वाजता ब्रेकफास्टसाठी भेट असू. त्यावेळी विविध मुद्द्यांवर आमची चर्चा होत असे. रेड्डींचे प्रत्येक विषयाबाबतचे ज्ञान, आकलन क्षमता, इंग्रजी आणि तेलुगू भाषेवरील पकड आणि उर्दु भाषेबाबतची माहिती उत्तम होती. त्यांचे जाणे दु:खदायी आहे.'' असे सांगताना व्यंकय्या नायडूंना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.