कर्नाटकातील वाद मिटविण्यासाठी वेणुगोपाल यांची शिष्टाई; सरकार टिकविण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:29 AM2019-05-30T04:29:46+5:302019-05-30T04:30:04+5:30
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या आघाडी सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस आमदार, नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली.
बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या आघाडी सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस आमदार, नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा त्यात काही बदल होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, आघाडीतील दोन्ही पक्षांतील कुरबुरीही वाढल्या आहेत.
वेणुगोपाल मंगळवारी रात्री बंगळुरूमध्ये दाखल झाले. कुमारस्वामी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांची त्यांनी बुधवारी बैठक घेतली. त्यानंतर, कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये काँग्रेस आमदारांनी कुमारस्वामी यांच्या कारभाराबद्दल वेणुगोपाल यांच्याकडे तक्रारी केल्याचे समजते. राज्यातील काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कुमारस्वामींबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कुमारस्वामी मंत्रिमंडळात सध्या जनता दलाच्या वाट्याच्या दोन व काँग्रेसची एक अशा तीन जागा रिकाम्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात त्या भरून काढण्याचे गाजर दोन्ही पक्षांतील आमदारांना त्यांच्या नेत्यांनी दाखविले होते, पण अद्याप तसा निर्णय होत नसल्याने काँग्रेसच्या आमदारांत असंतोष पसरला आहे. कुमारस्वामींच्या ३४ जणांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात काँग्रेसचे २२ व जनता दलाचे १२ मंत्री आहेत. कुमारस्वामींचे सरकार केव्हाही कोसळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. (वृत्तसंस्था)