ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:19 PM2024-11-27T22:19:00+5:302024-11-27T22:19:41+5:30
Venus Orbiter Mission: शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान 475 अंश सेल्सिअस असल्यामुळे, ही मोहिम ISRO ची सर्वात आव्हानात्मक मोहिम असेल.
Venus Orbiter Mission : शुक्र हा पृथ्वीचा शेजारी आहे. हा पृथ्वीपासून सुमारे 4 कोटी किमी दूर आहे. शुक्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत अनेक मोहिमा सुरू केल्या गेल्या आहेत, परंतु या ग्रहाची सर्व गुपिते अद्याप समोर आलेली नाही. अशातच, आता ISRO ने शुक्राची गुपिते जाणण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. इस्रोने शुक्र मोहिमेची तयारी सुरू केली असून, लवकरच एक यान शुक्र ग्रहावर पाठवले जाणार आहे. इस्रोचे हे सर्वात आव्हानात्मक मिशन असेल.
भारताचे शुक्र मिशन काय आहे?
शुक्र ग्रहाला इंग्रजीत व्हीनस म्हणतात. भारताने आखलेल्या मोहिमेला VOM म्हणजेच व्हीनस ऑर्बिटर मिशन, असे नाव देण्यात आले आहे. हे एक ऑर्बिटर मिशन आहे, जे शुक्र ग्रहाची प्रदक्षिणा करेल आणि ग्रहाचे वातावरण, पृष्ठभाग आणि सूर्याच्या ग्रहावरील परिणांचा अभ्यास करेल. शुक्राच्या वातावरणातील धुळीचे परीक्षण करुन ग्रहाची छायाचित्रेदेखील गोळा करेल. मिशन अंतर्गत, इस्रो शुक्राच्या चमकदार हवेचे विश्लेषण करेल आणि शुक्राचा पृष्ठभाग इतका गरम का आहे, याचाही शोध घेतला जाईल.
इस्रोचे सर्वात कठीण मिशन का आहे?
शुक्र मोहिमेत यानाला शुक्राच्या कठोर वातावरणाच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान 475 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. हे तापमान काच वितळवू शकते. याशिवाय, ग्रहाचे वातावरण कार्बन डायऑक्साइड आणि सल्फ्यूरिक ऍसिडचे विषारी मिश्रण आहे. या ग्रहाच्या वातावरणाचा दाबदेखील पृथ्वीच्या तुलनेत अंदाजे 92 पट जास्त आहे. अशा स्थितीत अंतराळ वाहन तयार करण्यासाठी इस्रोच्या अभियंत्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांना असे वाहन तयार करावे लागेल, जे अति तापमान सहन करू शकेल आणि शुक्राच्या वातावरणाचा दाबही सहन करू शकेल.
मिशन कधी सुरू होणार?
इस्रोने 2012-13 मध्ये व्हीनस मिशनची संकल्पना तयार केली होती. 2017-18 मध्ये इस्रोच्या बजेटमध्ये वाढ झाल्यानंतर यावर काम प्रामुख्याने काम सुरू करण्यात आले. पण, कोविडमुळे मिशनला विलंब झाला. यानंतर इस्रो चांद्रयान-3 आणि गगनयान सारख्या प्रकल्पांमध्ये व्यस्त झाले. आता मार्च 2028 मध्ये शूक्र मिशन लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ पी. श्रीकुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, दर 19 महिन्यांनी शुक्रावर मोहीम प्रक्षेपित करण्याची संधी येते, अशा परिस्थितीत ISRO कडे 2026 आणि 2028 च्या दोन विंडो आहेत. सध्या मिशनवर काम सुरू आहे, त्यामुळे 2028 पर्यंत मिशन लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
इस्रोचे अंतराळयान शुक्रावर कसे पोहोचेल?
मार्च 2028 मध्ये शुक्र सूर्यापासून सर्वात दूर असेल आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. अशा स्थितीत यान पृथ्वीच्या कक्षेत सोडले जाईल आणि त्यानंतर येथील गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने ते पृथ्वीच्या कक्षेतून शुक्राच्या दिशेने सोडले जाईल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ते सुमारे 140 दिवसांचा प्रवास करून शुक्राच्या कक्षेत प्रवेश करेल आणि तेथून पुढील 4 वर्षांपर्यंत रहस्ये उघड करेल.