२४ मागासवर्गीयांच्या हत्याकांडाचा निकाल; कोर्टात तब्बल ४४ वर्षांनंतर तिघे दोषी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 08:43 IST2025-03-16T08:30:33+5:302025-03-16T08:43:46+5:30
खटला चालू असताना दरोडेखोरांचा नेता संतोषा आणि राधेसह १७ पैकी १३ आरोपींचा मृत्यू झाला. एक दरोडेखोर फरार आहे. फक्त तीन दरोडेखोरांवर पूर्ण खटला चालला.

२४ मागासवर्गीयांच्या हत्याकांडाचा निकाल; कोर्टात तब्बल ४४ वर्षांनंतर तिघे दोषी!
डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली : चार दशकांहून अधिक काळ लोटला. उत्तर प्रदेशात झालेल्या २४ मागासवर्गीयांच्या हत्याकांडाने देशाला हादरवून टाकले होते. तत्कालीन पंतप्रधान आणि विरोधी पक्षाचे नेते घटनास्थळी धावले होते. तरीही या हत्याकांडाचा निकाल तब्बल ४४ वर्षांनंतर लागला व यात तिघांना दोषी ठरविण्यात आले.
१८ नोव्हेंबर १९८१ रोजी, संतोष सिंग ऊर्फ संतोषा आणि राधे श्याम ऊर्फ राधे या दरोडेखोरांच्या टोळीने उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील दिहुली गावात मागासवर्गीयांवर हल्ला केला. महिला, मुलांसह २४ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. त्यांची रोकड व ऐवज लुटला.
१७ पैकी १३ जणांचा मृत्यू
खटला चालू असताना दरोडेखोरांचा नेता संतोषा आणि राधेसह १७ पैकी १३ आरोपींचा मृत्यू झाला. एक दरोडेखोर फरार आहे. फक्त तीन दरोडेखोरांवर पूर्ण खटला चालला.
विशेष न्यायाधीश इंदिरा सिंग यांनी कप्तान सिंग, राम पाल आणि राम सेवक यांना हत्या, दरोडा, दहशत, अवैध शस्त्र इत्यादी गुन्ह्यांत दोषी ठरविले आहे.
पदयात्रा काढली होती
या हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी शोकाकुल कुटुंबांना भेटण्यासाठी दिहुलीत गेल्या होत्या.
विरोधी पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी पीडित कुटुंबांसोबत ऐक्य व पाठिंबा दाखवत दिहुली ते फिरोजाबादमधील सादुपूर अशी पदयात्रा काढली होती. १८ मार्चला आरोपींना शिक्षा जाहीर होणार आहे.