व्हीव्हीपॅटची पडताळणी मतमोजणीच्या आधी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 06:30 AM2019-05-22T06:30:45+5:302019-05-22T06:31:30+5:30

विरोधी पक्षांची मागणी : तफावत आढळल्यास सर्व मते तपासा

Verify the VVPAT before the counting of votes | व्हीव्हीपॅटची पडताळणी मतमोजणीच्या आधी करा

व्हीव्हीपॅटची पडताळणी मतमोजणीच्या आधी करा

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची येत्या गुरुवारी मतमोजणी करताना मतदानयंत्रांमधील मतांची मोजणी करण्याआधी व्हीव्हीपॅट पडताळणी केली जावी आणि यात एका जरी मतात तफावत आढळली, तर त्या विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदानयंत्रांमधील मतांची व्हीव्हीपॅट पडताळणी करून नंतरच मतमोजणी सुरू केली जावी, अशी मागणी २२ विरोधी पक्षांनी मंगळवारी निवडणूक आयोगाकडे केली.


पुन्हा ‘रालोआ’चे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता वर्तविणारे एक्झिट पोलचे अंदाज व देशाच्या मतदानयंत्रे स्ट्राँगरूममधून अन्यत्र हलविली गेल्याच्या कथित बातम्यांवरून निर्माण झालेले शंकेचे वातावरण, यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांची सकाळी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेत रणनीतीची आखणी केली. त्यानंतर, या पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले.


आयोगाकडे वरीलप्रमाणे मागणी केल्याचे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही सातत्याने आयोगाकडे हीच मागणी करीत आहोत. बुधवारी बैठक घेऊन यावर विचार करू, असे आयोगाने सांगितले. तृणमूलच्या शिष्टमंडळानेही आयोगाची भेट
घेऊन भाजपने राज्यात घातलेल्या गोंधळाच्या तक्रारी केल्या.


आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की, मतदारांनी जो कौल दिला आहे, त्याचा आदर केला जायला हवा. त्यात कोणतीही गडबड होण्याची शक्यता राहू देऊ नये, एवढाच आमचा आग्रह आहे.


सकाळच्या बैठकीत काँग्रेसतर्फे अहमद पटेल, गुलाम नबी आझाद व अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूलचे डेरेक ओ’ब्रायन, सपचे रामगोपाल यादव, द्रमुकच्या कणिमोळी, राजदचे मनोज झा यांच्यासह १९ पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

भाजपला बहुमत अशक्यच : विरोधक
विरोधकांच्या बैठकीतही संभाव्य निकाल आणि त्यानंतर उचलावयाची पावले याबाबत चर्चा झाली. बहुसंख्य नेत्यांनी एक्झिट पोलवर आपला विश्वास नसल्याचे सांगितले, तसेच मतमोजणीच्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भाजप व रालोआला बहुमत मिळणार नाहीत, असा दावा बहुसंख्य नेत्यांनी केला.


ईव्हीएमची वाहतूक आता कशासाठी?

शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी संपल्यानंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये पाठविण्यात आली. तिथे ती बंदिस्त असून, त्या ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान तैनात असून, विविध पक्षांचे कार्यकर्तेही तळ ठोकून आहेत.
असे असताना उत्तर प्रदेश व बिहारमध्ये गेले दोन दिवस वाहनांतून ईव्हीएमची वाहतूक सुरू होती. त्यापैकी काही ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये नेल्यामुळे या यंत्रांमध्ये काही तरी गडबड असल्याची शंका विरोधी कार्यकर्ते व नेते करीत आहेत.
केंद्रातील सत्ताधारी पक्षाला, त्या यंत्रांवर मतदान करून ती नेली असावीत, असा विरोधकांचा संशय आहे.

 

Web Title: Verify the VVPAT before the counting of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.