Ratan Tata : गरजूंना मदतीचा 'विश्वास'; दानशूर रतन टाटा PM CARES चे विश्वस्त; सुधा मूर्ती सल्लागार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:42 PM2022-09-21T14:42:56+5:302022-09-21T14:43:28+5:30
पीएम केअर्स फंड बोर्ड ऑफ ट्रस्टीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला.
पीएम केअर्स फंड बोर्ड ऑफ ट्रस्टीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. मंगळवारी भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्यासह अनेकांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर सुधा मूर्ती यांचा सल्लागार गटात समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि नवनियुक्त विश्वस्त उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडमध्ये भारतीयांनी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुकही केलं. बैठकीदरम्यान, निधीच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमांची माहितीही देण्यात आली. यामध्ये पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन स्कीमचाही समावेश आहे. याद्वारे ४ हजार ३४५ मुलांची मदतही केली जात आहे. नवे विश्वस्त आणि सल्लागारांच्या येण्यानं पीएम केअर्स फंडच्या कामाला नवा दृष्टीकोन मिळेल, असं मोदी यावेळी म्हणाले.
यांचाही समावेश
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती केटी थॉमस, माजी उपसभापती कारिया मुंडा आणि उद्योजक रतन टाटा यांना विश्वस्त म्हणून पीएम केअर्समध्ये सामील करण्यात आलं आहे. बैठकीनंतर सल्लागार समूहातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये माजी कॅग राजीव महर्शी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी चेअरपर्सन सुधा मूर्ती, इंडिकॉर्प्स आणि पिरामल फौऊंडेशनचे माजी सीईओ आनंद शाह यांचाही समावेश करण्यात आलाय.