ज्येष्ठ पत्रकार कामथ कालवश
By admin | Published: October 10, 2014 05:53 AM2014-10-10T05:53:32+5:302014-10-10T05:53:32+5:30
ज्येष्ठ पत्रकार व प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष माधव विठ्ठल तथा एम.व्ही. कामथ यांचे येथे गुरुवारी सकाळी निधन झाले.
मणिपाल (कर्नाटक) : ज्येष्ठ पत्रकार व प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष माधव विठ्ठल तथा एम.व्ही. कामथ यांचे येथे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. बुधवारी रात्री छातीत दुखत असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे मणिपाल विद्यापीठाचे संचालक अलेक्झांडर चंडी यांनी सांगितले. कामथ हे मणिपाल स्कूल आॅफ कम्युुनिकेशनचे संचालक म्हणून कार्यरत होते. रसायन तंत्राचे औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रारंभी डाय केमिस्ट, अॅनलिटिकल केमिस्ट आणि सहायक व्यवस्थापक अशा विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांनी १९४६ साली मुंबईत ‘द फ्री प्रेस जर्नल’मध्ये वार्ताहर म्हणून काम करून पत्रकारितेत प्रवेश केला होता.
सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी १९५५ ते ५८ या काळात संयुक्त राष्ट्रात पीटीआयचे विशेष प्रतिनिधी म्हणून बजावलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. इलस्ट्रेटेड विकली आॅफ इंडियाचे संपादक, फ्री प्रेस बुलेटिन, भारत ज्योती, फ्री प्रेस जर्नलमध्ये एडिटर इन चार्ज अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. (वृत्तसंस्था)