ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 09:19 AM2023-03-15T09:19:05+5:302023-03-15T09:19:19+5:30
ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्रसिद्ध तज्ज्ञ वेद प्रताप वैदिक यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे प्रसिद्ध तज्ज्ञ वेद प्रताप वैदिक यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
वैदिक यांचे खासगी सहायक मोहन यांनी सांगितले की, ते सकाळी त्यांच्या गुरुग्राम येथील घरातील बाथरूममध्ये बेशुद्ध पडले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वैदिक यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) सोबतच ‘भाषा’ या हिंदी वृत्तसंस्थेचे संस्थापक-संपादक म्हणून दशकभर काम केले. नवभारत टाइम्समध्ये त्यांनी संपादक पदही भूषवले. भारतीय भाषा संमेलनाचे ते अध्यक्षही होते. वैदिक २०१४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदची मुलाखत घेतल्यानंतर ते वादात सापडले होते. वैदिक यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
हिंदी पत्रकारितेची आणि हिंदी जगताची कधीही भरून न येणारी हानी
तल्लख पत्रकार आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व असलेले वेद प्रताप वैदिक यांच्या जाण्याने संपूर्ण हिंदी पत्रकारितेची आणि हिंदी जगताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. हिंदीच्या सन्मानासाठी त्यांनी नेहमीच संघर्ष केला. लोकमत समूहाप्रती त्यांचे ऋणानुबंध अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिले. ते दिल्लीत आयोजित लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार होते, पण त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. माझे विनम्र अभिवादन. - विजय दर्डा, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"