ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 09:13 AM2019-09-08T09:13:49+5:302019-09-08T10:21:47+5:30
ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र महेश जेठमलानी आणि अमेरिकेत राहणारी मुलगी असा परिवार आहे. जेठमलानी आजारी असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
राम जेठमलानी यांचा जन्म 14 सप्टेंबर 1923 रोजी तत्कालीन मुंबई प्रांत असलेल्या पाकिस्तानमधील शिकारपूरमध्ये झाला. त्यांनी एस. सी. शहानी लॉ कॉलेजमधून वयाच्या 17 व्या वर्षी कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अनेक खटल्यांचे कामकाज पाहिले. हाजी मस्तान, हर्षद मेहता असो वा केतन पारेख वादग्रस्त न्यायालयीन प्रकरण आणि विधिज्ञ राम जेठमलानी हे गेली सात दशके असणारं समीकरण.
Veteran lawyer Ram Jethmalani passes away at his residence in Delhi. He was 95 years old. (file pic) pic.twitter.com/Utai8qxxh4
— ANI (@ANI) September 8, 2019
राम जेठमलानी यांनी ‘या’ व्यक्तींसाठी केलीय वकिली!
- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मारेक-यांची बाजू न्यायालयात मांडली.
- दिल्लीतील उपहार सिनेमा आग प्रकरणी मालक अन्सल बंधुंविरोधातील खटला.
- जेसिका हत्या प्रकरणातील मनू शर्माची न्यायालयात बाजू मांडली.
- 16 वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूसाठी त्यांनी खटला लढवला.
- लालकृष्ण अडवाणी यांची हवाला खटल्यात बाजू मांडली.
- सोहराबुद्दीन खटल्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाजूने न्यायालयात लढले.
- 2 जी घोटाळ्यातील डीएमके नेत्या कनिमोळी यांच्यातर्फे त्यांनी बाजू मांडली.
- शेअर बाजारातील दलाल हर्षद मेहता यांची बाजू न्यायालयात मांडली. याचबरोबर, हाजी मस्तान आणि केतन पारेख यांची सुद्धा त्यांनी वकिली केली.
- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याविरोधातील अवैध उत्खनन खटल्यात त्यांची बाजू मांडली.
- चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यातर्फे न्यायालयात युक्तिवाद केला.
- केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुद्धा त्यांनी या प्रकरणात बाजू मांडली. मात्र, नंतर याप्रकरणातून त्यांनी माघार घेतली.