“नुपूर शर्माचे विधान कायदेशीर की बेकायदा ते कोर्ट ठरवेल”; विश्व हिंदू परिषदेचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 09:18 AM2022-06-08T09:18:58+5:302022-06-08T09:20:18+5:30
नुपूर शर्मा यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर देशातील अनेक ठिकाणी उसळलेला हिंसाचार कायदेशीर आहे का, असा सवाल विहिंपने केला आहे.
नवी दिल्ली: भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर देशात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. आखाती देशांनीही नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. मात्र, नुपूर शर्मा यांना भाजपमधून समर्थन वाढत चालले असून, या वादात आता विश्व हिंदू परिषदेने (VHP) उडी घेतली आहे. नुपूर शर्मा यांना पाठिंबा दर्शवत, त्यांच्या विधानाबाबत न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.
‘विहिंप’चे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी नुपूर शर्मा यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. नुपूर शर्मा यांचे विधान कायदेशीर की, बेकायदा आहे, हा गुन्हा आहे की नाही, हे न्यायालयच ठरवू शकते. पण, न्यायालयाच्या निकालाची वाट बघण्याआधीच देशभर हिंसाचार केला जात आहे, असे मत व्यक्त करत आलोक कुमार यांनी नुपूर शर्मा यांना पाठीशी घातले.
हा हिंसाचार कायदेशीर आहे का?
आलोक कुमार यांनी नुपूर शर्मा यांचा निषेध करण्यासाठी होत असलेल्या निदर्शनांवर आक्षेप नोंदवला. न्यायालयाच्या निकालची वाट न बघता हिंसक निदर्शने कशी होऊ शकतात, हा हिंसाचार कायदेशीर आहे का? प्रेषित पैगंबरांसंदर्भात कोणी काही बोलले तर जीभ छाटून टाकली जाईल, अशी जाहीर धमकी दिली जात आहे. अशा भाषेत कोण कसे बोलू शकते? धमकी देणारे लोक कायदा हातात घेत असून ही खूपच चिंतेची बाब म्हणावी लागेल, असे आलोक कुमार म्हणाले.
मुंबई, ठाणे, पुणे व हैदराबाद या चार शहरांमध्ये गुन्हा दाखल
नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई, ठाणे, पुणे व हैदराबाद या चार शहरांमध्ये गुन्हा दाखल झाला असला, तरी दिल्लीत मात्र त्यांच्या विरोधात कोणीही पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाही. उलट, नुपूर शर्मा यांनीच दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली असून, आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. त्याच्या विनंतीनुसार, दिल्ली पोलिसांनी नूपुर व त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्ष प्रवक्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात विशेषत: धार्मिक भावना दुखावू नयेत, असे निर्देश दिले आहेत. भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी एका विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर इस्लामिक देशांनी भारताविरुद्ध राजकीय स्तरावर विरोध व्यक्त केला. तसेच भारतीय उत्पादनावर बहिष्काराचे आवाहनही केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भाजपच्या एक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानुसार सर्व नेते आणि प्रवक्त्यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय प्रसार माध्यम विभागाच्या परवानगीशिवाय निवेदन जारी करु नये. कोणता प्रवक्ता,कोणत्या टीव्ही चॅनलवर पक्षाची बाजू मांडेल, हे भाजपची माध्यम समिती ठरविते. यासाठी त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या जातात.