'जय पॅलेस्टाईन'मुळे मोठा वाद; VHP-बजरंग दलची असदुद्दीन ओवेसींविरोधात जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 03:06 PM2024-06-30T15:06:31+5:302024-06-30T15:09:33+5:30
VHP-Bajrang Dal Protest: असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेताना 'जय पॅलेस्टाईन' असा नारा दिला होता.
Asaduddin Owaisi News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यादरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'जय पॅलेस्टाईन'ची घोषणा दिली होती. त्यांच्या या घोषणेमुळे बराच वाद निर्माण झाला. दरम्यान, आज(दि.30) विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने त्यांच्याविरोधात दिल्लीत जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली.
बिघडलेली परिस्थिती पाहून दिल्ली पोलिसांनी आधीच बॅरिकेड लावले होते. मात्र, विहिंप आणि बजरंग दलाचे सदस्य बॅरिकेडिंगवर चढून घोषणाबाजी करताना दिसले. त्यांच्या हातात ओवेसींचा आक्षेपार्ह फोटोही होता. आंदोलनात सहभागी झालेल्यांनी 'संसदेची प्रतिष्ठा भंग करणारे असे खासदार नकोत,' अशा आशयाचे फलक हातात घेतले होते.
#WATCH दिल्ली: विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के सदस्यों ने संसद में शपथ ग्रहण समारोह के दौरान 'जय फिलिस्तीन' के नारे लगाने को लेकर AIMIM MP असदुद्दीन ओवैसी के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। pic.twitter.com/8vBfwuKpaB
— ANI_HindiNews (@AHindinews) June 30, 2024
शपथविधीदरम्यान जय पॅलेस्टाईनचा नारा
मंगळवारी (25 जून) लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेताना असदुद्दीन ओवेसी यांनी जय पॅलेस्टाईनचा नारा देत वाद निर्माण केला. उर्दूमध्ये शपथ घेतल्यानंतर त्यांनी शेवटी 'जय भीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन'चा नारा दिला. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी काही मिनिटे संसदेत गदारोळ केला. या नाऱ्याची परिणाम संसदेच्या बाहेरदेखील उमटत आहेत.
ओवेसी काय म्हणाले?
ओवेसी यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, "सत्ताधारी पक्षाला जे करायचे ते करू द्या. मलाही संविधानाची थोडीफार माहिती आहे. या पोकळ धमक्या माझ्यावर चालणार नाहीत. प्रत्येकजण खूप काही बोलत होते. मी फक्त जय भीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन म्हणालो. हे कसे संविधानाच्या विरोधात नाही," असे ओवेसी म्हणाले.