उपराष्ट्रपतींकडून बरेचकाही शिकलो - मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:07 AM2017-08-11T01:07:05+5:302017-08-11T01:07:13+5:30
माझ्या प्रत्येक परदेश दौऱ्याआधी व नंतर उपराष्ट्रपतींकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. दहा वर्षांच्या कारकिर्दीत अन्सारींनी सर्वांना सांभाळले. संसदीय इतिहासातही मोलाची भर घातली.
नवी दिल्ली : माझ्या प्रत्येक परदेश दौऱ्याआधी व नंतर उपराष्ट्रपतींकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. दहा वर्षांच्या कारकिर्दीत अन्सारींनी सर्वांना सांभाळले. संसदीय इतिहासातही मोलाची भर घातली. अन्सारी अशा कुटुंबाचे प्रतिनिधी आहेत की ज्याने देशाच्या इतिहासात खिलाफत चळवळीपासून अनेक बाबतींत मोठे योगदान दिले आहे. उपराष्ट्रपतीपदावरून निवृत्त होताना आपले स्वास्थ्य उत्तम आहे. यापुढे आपण बहुधा नव्या क्षेत्राच्या दिशेने प्रयाण करणार आहात. आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहून चांगले काम करावे, यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत काढले.
राज्यसभेत गुरुवारी सदस्यांनी उपराष्ट्रपती अन्सारींना भावपूर्ण निरोप दिला. सभागृह नेते अरुण जेटली, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, डॉ. करण सिंग, तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, राष्ट्रवादीचे माजिद मेमन, शिवसेनेचे संजय राऊत, जद(यु)चे अली अनवर अन्सारी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव या नेत्यांनी अन्सारींच्या कामकाज पद्धतीचा, वेळोवेळी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा व नि:पक्षपातीपणाचा उल्लेख करीत गौरवपूर्ण भाषणे केली.