उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जगदीप धनखड ट्वीटरवर लोकप्रिय; फॉलोअर्सची संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 06:25 AM2022-07-19T06:25:20+5:302022-07-19T06:26:52+5:30
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनी सोमवारी आपला अर्ज दाखल केला.
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदासाठी जगदीप धनखड यांची उमेदवारी घोषित होण्याआधी त्यांचे दोनच ट्वीटर अकाऊंट होते. एका दिवसात अचानक पाच ट्वीटर अकाऊंट अवतरल्याने ते ट्वीटवर लोकप्रिय झाले आहेत. यापैकी त्यांच्या एका ट्वीटर अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या सात हजारांपेक्षा जास्त आहे.
आधी त्यांचे पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून एक आणि दुसरे त्यांच्या नावाने एक ट्वीटर अकाऊंट होते. एक अकाऊंट पश्चिम बंगालचे राज्यपालाच्या भूमिकेशी संबंधित असून दुसऱ्या अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अन्य मान्यवर नेत्यांसोबतच्या बैठकीशी संबंधित मालिका दाखविण्यात आली आहे.
परंतु, अचानक एका दिवसात त्यांचे पाचहून जास्त ट्वीटर अवतरले आहेत. या सर्वांवर त्यांचे छायाचित्र आहेत. त्यांच्या एका अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या ७ हजारांहून जास्त आहे.
या पाचही ट्वीटर अकाऊंटवर तीन प्रकारचे प्रोफाईल फोटो आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी रोजच्या वादंगावरून धनखड हे चर्चेत आले, ही बाब वेगळी आहे. तथापि, त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलचे फारसे फॉलोअर्स नाहीत.
त्यांच्या ट्वीटर अकाऊंटच्या फालोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या ट्वीटर अकाऊंट्सपैकी एक भाजपमार्फत संचालित केले जाते, दुसरे त्यांच्या नावाने त्यांचा एक प्रशंसक संचालित करतो. एकूणच राष्ट्रीयस्तरावर वाढती लोकप्रियता मिळत असल्याने ते सुखावल्याचे वाटते.
धनखड यांचा उमेदवारी अर्ज दाखल
६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांनी सोमवारी आपला अर्ज दाखल केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. धनखड यांनी पत्रकारांना सांगितले की, शेतकऱ्याच्या मुलाला उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला उभे राहण्याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे. लोकशाही मूल्ये वृद्धिंगत होण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे.
धनखड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस, अनुप्रिया पटेल, रामदास आठवले, भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, जनता दल (युनायटेड) या पक्षाचे प्रमुख ललन सिंह, बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा व एनडीएच्या इतर घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना त्यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य काही नेत्यांनी अनुमोदन दिले.