उपराष्ट्रपती निवडणूक : नितीश कुमार, नवीन पटनायक यांचा गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:36 AM2017-07-19T04:36:08+5:302017-07-19T04:36:08+5:30
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांचे गोपाळकृष्ण गांधी यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. त्याआधी नायडू यांनी मंत्रिपदाचा
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे व्यंकय्या नायडू व विरोधी पक्षांचे गोपाळकृष्ण गांधी यांनी मंगळवारी अर्ज दाखल केले. त्याआधी नायडू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला.
ही निवडणूक ५ आॅगस्ट रोजी होणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मुदत १९ आॅगस्ट रोजी संपत आहे. लोकसभा व राज्यसभा यांतील ७१६ सदस्य त्यासाठी मतदान करतील. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देणाऱ्या नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल यांनी आता गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
गोपाळकृष्ण गांधी म्हणाले की, देशातील सामान्यांचा आज राजकीय पक्ष व राजकारणावरील विश्वास उडत चालला असून, हे चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू. देशाची धर्म, जात अशी जी विभागणी होत आहे, ती थांबवणे, ते माझे कर्तव्य आहे, असे मी मानतो.
मला आता पक्ष नाही अर्ज भरल्यानंतर नायडू म्हणाले की, आता मी कोणत्याही पक्षाशी संबंधित राहिलेलो नाही. चाळीस वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात मी कधीही भेदभाव केला नाही, उपराष्ट्रपती झाल्यावरही तो करणार नाही. राधाकृष्णन, झाकीर हुसेन, हिदायतुल्ला, वेंकटरामन, शंकर दयाळ शर्मा, भैरोसिंह शेखावत यांच्यासारख्या दिग्गजांनी उपराष्ट्रपतिपद भूषविले आहे, याची मला कल्पना आहे. त्यामुळे त्या पदाचा आब व मान कायम राखू.
स्मृती इराणींकडे माहिती व प्रसारण
व्यंकय्या नायडू यांच्याकडील खात्यांची जबाबदारी मोदी यांनी अन्य मंत्र्यांना दिली. माहिती व प्रसारण खाते स्मृती इराणी यांना दिले आहे. त्या वस्त्राद्योगमंत्री आहेत. त्यांनी आजच या खात्याची सूत्रे स्वीकारली. नगरविकास खाते नरेंद्र सिंग तोमार यांच्याकडे देण्यात आले. तोमार सध्या ग्रामविकास व पंचायत राजमंत्री आहेत.