VIDEO: 164 फूट उंचीवर चढून जवानाने फडकावला तिरंगा
By admin | Published: August 16, 2016 01:01 PM2016-08-16T13:01:40+5:302016-08-16T13:15:37+5:30
काश्मीरमधील त्राल परिसरात भारतीय जवानाने चक्क 164 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून भारतीय झेंडा फडकवला. याचा व्हिडीओही शूट करण्यात आला आहे.
Next
>- ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 16 - 15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना काश्मीरमध्ये मात्र गेले काही दिवस सुरु असलेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारतीय जवानांनी काश्मीरमध्ये केलेल्या ध्वजारोहणामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. देशभरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं मात्र काश्मीरमधील त्राल परिसरात भारतीय जवानाने चक्क 164 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून भारतीय झेंडा फडकवला. याचा व्हिडीओही शूट करण्यात आला आहे.
दक्षिण काश्मीरमधील त्राल भागात काही फुटीरतावाद्यांनी पाकिस्तानच्या स्वांतत्र्यदिनाला सुमारे 50 मीटर उंचीच्या या मोबाईल टॉवरवर पाकिस्तानचा झेंडा फडकावला होता. हा झेंडा काढून भारताचा झेंडा फडकवण्यासाठी भारतीय जवानांनी जिवाची बाजी लावली. विशेष म्हणजे भारतीय जवानांनी खात्मा केलेल्या बु-हान वानीचं हे गाव आहे. बु-हान वानीच्या हत्येमुळेच काश्मीर खो-यात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु असून अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे.
यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या सचिन कुमार या जवानाने कमांडिग ऑफिसरकडून पाकिस्तानचा झेंडा हटवून भारतीय झेंडा फडकवण्याची परवानगी मागितली होती.
तिंरगा फडकवताना जवानावर दहशतवाद्याकडून हल्ला होण्याची शक्यता होती, मात्र कशाचीही पर्वा न करता शौर्याने सचिन कुमार या जवानाने मोबाईल टॉवरवर चढून भारतीय तिरंगा डौलाने फडकावला. इतकचं नाही तर तिरंगा फडकावल्यानंतर जवानाने तिरंग्याला सलामीही दिली. तिरंगा फडकवतानाचा हा व्हिडीओ ड्रोनच्या सहाय्याने शूटदेखील करण्यात आला आहे.