Video: अभिनेता राहुल वोहराचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ; “ऑक्सिजनऐवजी रिकामा मास्क लावून निघून जातात डॉक्टर”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 02:50 PM2021-05-10T14:50:14+5:302021-05-10T14:54:58+5:30
ज्योती तिवारीनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यात राहुलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
नवी दिल्ली – कोरोनामुळे अभिनेता राहुल वोहराचं रविवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता. राहुल वोहराच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यात पत्नी ज्योती तिवारीने पती राहुलच्या मृत्यूनंतर त्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.
ज्योती तिवारीनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यात राहुलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाबद्दल भाष्य करत आहे. या व्हिडीओत राहुल वोहरा ऑक्सिजन मास्क हटवून सांगतात की, आजच्या घडीला याची खूप किंमत आहे. याच्याशिवाय रुग्ण तडफडतो. त्यानंतर हा मास्क पुन्हा घालून ते परत हटवतात आणि सांगतात यात काहीच येत नाही. यापुढे राहुल सांगतो की, नर्स आली तिला मी बोललो, तर तिने सांगितलं एक बॉटल असते त्यातून पाणी येत असतं. त्यानंतर ती निघून गेली. पुन्हा आवाज दिला तरी परतली नाही. १-२ तासानंतर पुन्हा येतात तोपर्यंत मेनेज करायला लागतं. मी या खाली मास्कचं करू काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"मला चांगले उपचार मिळाले असते तर..."; फेसबुकवर अखेरची पोस्ट लिहून अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
यावर राहुलच्या पत्नीने सोशल मीडियात लिहिलंय की, प्रत्येक राहुलसाठी न्याय हवा. माझा राहुल गेला हे सगळ्यांना माहिती आहे परंतु तो कसा गेला हे कोणालाही माहिती नाही. दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशाप्रकारे उपचार केले जातात. मला अपेक्षा आहे माझ्या पतीला न्याय मिळेल. अजून एक राहुल या जगातून जायला नको.
राहुलने अखेरच्या फेसबुकपोस्टमध्ये काय म्हंटलं होतं?
मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. तुमचा राहुल वोहरा. त्यापुढे म्हटलंय की, लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन आता हिंमत हरलो आहे असं राहुल वोहरा यांनी अखेरच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं.
राहुल वोहराने त्याच्या अनेक पोस्टमध्ये उपचारासाठी मदत मागितली होती. एका पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की, मी कोविड पॉझिटिव्ह आहे. सध्या माझ्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या ४ दिवसापासून माझ्या तब्येतीत कोणतीच सुधारणा होत नाही. असं कोणतं हॉस्पिटल आहे का? जिथं मला ऑक्सिजन बेड मिळेल कारण इथं माझी ऑक्सिजन पातळी सातत्याने खालावत आहे आणि मला कोणी पाहणारं नाही. मी खूप मजबुरीने ही पोस्ट लिहित आहे कारण घरातील आता सांभाळू शकत नाहीत.