VIDEO: अनुवादक स्वतःच्या मर्जीने मोदींना 'विश्वगुरू' म्हणाली; अमित शहांचा पारा चढला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 04:15 PM2018-05-09T16:15:12+5:302018-05-09T16:20:34+5:30
मी जितके बोलतोय त्याचाच अनुवाद करा. त्यामध्ये उगाच स्वत:च्या मनाने वाक्ये घालू नका.
बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून सर्व ताकद पणाला लावण्यात आली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष अमित शहा जातीने प्रचारात उतरले आहेत. येथील नेलमंगला विधानसभा मतदारसंघातही मंगळवारी अमित शहांची जाहीर सभा झाली. यावेळी घडलेल्या एका प्रसंगामुळे वातावरणात काहीसा तणाव निर्माण झाला होता. अमित शहा याठिकाणी हिंदीत भाषण करत होते. एक स्थानिक महिला अनुवादक या भाषणाचे कानडीत भाषांतर करत होती. भाषणादरम्यान अमित शहा यांनी मोदींना आव्हान देणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टिप्पणी केली. तेव्हा महिला अनुवादकाने शहांच्या वाक्याचे भाषांतर करताना मोदींसाठी 'विश्वगुरू' आणि 'प्रधानसेवक' ही स्वत:च्या पदरातील विशेषणे जोडली. त्यामुळे अमित शहांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी सर्वांदेखत या महिला अनुवादकाची चांगलीच हजेरी घेतली.
मी जितके बोलतोय त्याचाच अनुवाद करा. त्यामध्ये उगाच स्वत:च्या मनाने वाक्ये घालू नका, असे शहांनी संबंधित महिलेला सुनावले. त्यानंतर अमित शहा यांनी पुन्हा बोलायला सुरूवात केली. मात्र, अमित शहांनी अचानक केलेल्या 'पाणउताऱ्यामुळे' महिला अनुवादक चांगलीच गांगरून गेली. त्यामुळे पुढच्या साध्यासोप्या वाक्याचे भाषांतर करताना ही महिला अनुवादक दोनदा अडखळली. तिने लगेचच माईक व्यासपीठावर उभ्या असलेल्या भाजपा नेत्याच्या हातात दिला आणि ती मागच्या बाजूला निघून गेली. त्यानंतर संबंधित नेत्याने उर्वरित भाषणाचे भाषांतर केले. मात्र, सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये या प्रसंगाची चांगलीच चर्चा रंगली होती.
मात्र, अमित शहांच्या या वर्तनामागे त्यांचा पूर्वानुभव कारणीभूत असावा. यापूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्या एका सभेत अमित शहा यांनी चुकून भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या येडुरिप्पा यांचा उल्लेख भ्रष्टाचारी असा केला होता. यावरून विरोधकांनी त्यांची चांगलीच खिल्लीही उडविली होती.
According to my sources, The Lady translator of Amit Shah speech in Nelamangala will soon get a Z Security pic.twitter.com/6DFMuIh6tv
— Unofficial Sususwamy (@swamv39) May 8, 2018