VIDEO:...आणि न्यूज एंकरने दिली पतीच्या मृत्यूची Breaking News
By Admin | Published: April 8, 2017 09:23 PM2017-04-08T21:23:59+5:302017-04-09T13:54:27+5:30
एखाद्या न्यूज चॅनलमध्ये काम करणा-या एंकरसाठी अपघातांच्या ब्रेकिंग न्यूज देणं ही सामान्य बाब आहे. पण छत्तीसगडमध्ये एका न्यूज एंकरला आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट बातमी द्यावी लागली.
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 8 - एखाद्या न्यूज चॅनलमध्ये काम करणा-या एंकरसाठी अपघातांच्या ब्रेकिंग न्यूज देणं ही सामान्य बाब आहे. पण छत्तीसगडमध्ये एका न्यूज एंकरला आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट बातमी द्यावी लागली. या महिला न्यूज एंकरने शनिवारची सुरुवात आपल्या पतीच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने केली.
छत्तीसगडमधील न्यूज चॅनल आयबीसी-24 च्या न्यूज एंकर सुप्रीत कौरसाठी शनिवार काळा दिवस ठरला. शनिवारी सकाळी सुप्रीत नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसला पोहोचल्या आणि नेहमीच्या वेळेवर स्टुडिओमध्ये जाऊन न्यूज बुलेटिन वाचायला त्यांनी सुरुवात केली. बुलेटिनदरम्यान महासमुंद जिल्ह्यातील पिथोरा येथे एका अपघाताची बातमी आली आणि एंकरने इतर बातम्यांप्रमाणे ती बातमी वाचली. आपण जी बातमी वाचतो आहोत त्यामध्ये आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे, याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती.
बातमी आणि रिपोर्टरचा फोनो झाल्यानंतर न्यूज एंकरला शंका आली. सुप्रीतने रिपोर्टरला फोन लावून अधिक माहिती घेतली. रिपोर्टर म्हणाला, गाडीत 5 जण होते आणि ट्रकसोबत गाडीची टक्कर झाली. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला मात्र, मृतांची नावं रिपोर्टर सांगू शकला नाही. ठार झालेल्या तिघांचे वर्णन त्याने सांगितले. त्यांचे वर्णन ऐकल्यावर आपला पती हर्षद कवाडे या अपघातात ठार झाला आहे, याची तिला शंका आली. कारण ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्याच दिशेने आपले पती 4 मित्रांसोबत गेले असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि सर्व प्रकार सुप्रीतच्या लक्षात आला.
हादरवून टाकणा-या या वृत्तानंतरही बुलेटिन संपवूनच सुप्रीत यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि कशाबशा स्टुडिओच्या बाहेर पडल्या. 28 वर्षांच्या सुप्रीत कौर यांचं एक वर्षापूर्वी हर्षद कवाडे यांच्यासोबत लग्न झालं होतं. ते दोघं रायपूरमध्ये वास्तव्यास होते.
"सुप्रीतने दाखवलेल्या हिमतीचं कौतुक करावं तितकं कमी आहे, ती खूप हिंमतवान आहे. आम्ही सुप्रीतसोबत काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, पण या घटनेमुळे तिच्याएवढाच जबर धक्का आम्हालाही बसला आहे," असं सुप्रीतसोबत काम करणारे तिचे सहकारी म्हणाले.