VIDEO-स्ट्रेचर नसल्याने एक्स-रेसाठी पतीला न्यावं लागलं फरफटत !
By admin | Published: June 2, 2017 04:35 PM2017-06-02T16:35:03+5:302017-06-02T16:35:03+5:30
. कर्नाटकातील सरकारी हॉस्पिटलमधील असुविधांचा फटका अशाच एका गरीब रुग्णाला बसला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
शिवामोगा, दि. 2- देशातील अनेक सरकारी हॉस्पिटलची अवस्था काय असते हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अपुऱ्या सोयी सुविधांमुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला अनेकदा लोक बिचकतात. पण ज्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही अशा लोकांना उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलचा सहारा घ्यावा लागतो. विशेष म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये असलेल्या असुविधांचा गरिब रूग्णांना जास्त त्रास सहन करावा लागतो. कर्नाटकातील सरकारी हॉस्पिटलमधील असुविधांचा फटका अशाच एका गरीब रुग्णाला बसला आहे. हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला चक्क फरफटत न्यावं लागलं. कर्नाटकमधील शिवामोग्गा इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.
कर्नाटकातील शिमोगामधल्या मेगन हॉस्पिटलमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार आहे. उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णाला डॉक्टरने एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या रूग्णाला एक्स रे विभागात घेऊन जायचं होतं. पण त्यावेळी तिथे स्ट्रेचर उपलब्ध नव्हतं. त्यामुळे रुग्णाला फरफटत नेण्याची वेळ त्याच्या पत्नीवर आली. विशेष म्हणजे या महिलेच्या मदतीला तिकडचा एकही कर्मचारी आला नाही. पतीला एक्स-रे काढण्यासाठी घेऊन जायचं आहे, असं सांगितल्यानंतर वॉर्डबॉयने महिलेकडे पैसे मागितल्याचं सांगण्यात येतं आहे. पैसे न दिल्याने त्यांनी स्ट्रेचर देण्यास नकार दिला, असंही सांगण्यात येत आहे. अखेर नाईलाजाने महिलेने आपल्या रुग्ण पतीला एक्स-रे विभागात फरफटत नेले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
#WATCH Wife drags husband to get X-ray done due to unavailability of stretcher at Megan Govt Hospital in K'taka's Shimoga(Last week's video) pic.twitter.com/IWKu5vhdPP
— ANI (@ANI_news) June 2, 2017