Video: पुल कोसळला, भाजप म्हणतंय पैसे खाल्ले; आता, मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 01:18 PM2023-06-05T13:18:58+5:302023-06-05T13:20:05+5:30

या घटनेनं मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा समोर आला. हा ब्रिज अनेक वर्षांपासून तयार होतोय आणि नीतीश कुमार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता

Video Bihar Bridge collapsed, BJP alleges of corruption; Now, Chief Minister Nitish Kumar said… | Video: पुल कोसळला, भाजप म्हणतंय पैसे खाल्ले; आता, मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले...

Video: पुल कोसळला, भाजप म्हणतंय पैसे खाल्ले; आता, मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले...

googlenewsNext

पाटणा - बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवर उभारण्यात येत असलेला पूल कोसळल्याची घटना रविवारी घडली. २०१४ मध्ये मुख्यमंत्रीनितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केली होती. सध्या, हा पूल कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवरून बिहारमधील भाजपने मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधत यात भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. आता, याप्रकरणी स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया देताना हे पुलाचं काम व्यवस्थीत होत नसल्याचं म्हटलंय. तसेच, १७१० कोटी रुपयांच्या या पूल दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

"या घटनेनं मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा समोर आला. हा ब्रिज अनेक वर्षांपासून तयार होतोय आणि नीतीश कुमार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. २०१४ मध्ये याची उभारणी सुरू करण्यात आली. याच्या खर्चात सातत्यानं वाढ करण्यात आली. गेल्या वर्षी वादळामुळे याचा भाग कोसळला होता. यावेळी कोणत्यातरी वाहनामुळे हा ब्रिज कोसळला. यावरून यात भ्रष्टाचार, चोरी आणि कमीशनखोरी झाल्याचं स्पष्ट होतंय. याचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे. नीतीश कुमार यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारावी," असं म्हणत भाजपने मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देतान चौकशी होईल, असे म्हटलंय. 

या पुलाचे बांधकाम व्यवस्थीत होत नाहीये, म्हणूनच तो सातत्याने कोसळतोय. याप्रकरणी मी संबंधितांच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, विभागाकडून यासंदर्भातील कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले. 

व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसले 

व्हायरल व्हिडीओमध्ये पुलाच्या एका पिलरचे ३० हून अधिक स्लॅब गंगा नदीत पडत असल्याचे दिसत आहे. हा पूल उभारण्याची जबाबदारी एका खाजगी कंपनीकडे देण्यात आली होती. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ३० एप्रिल २०२२ रोजी या पुलाच्या पिअर क्रमांक ४०५ आणि ६ मधील सुपर स्ट्रक्चर वाऱ्याच्या वेगाने कोसळलं होतं. त्यावेळीही या पुलाच्या बांधकामावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

चार लेनचा पूल

मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानगंज ते खगरिया दरम्यान बांधण्यात येत असलेला हा पूल चौपदरी होता. बांधकाम सुरू असलेल्या या पुलाचे सुपर स्ट्रक्चर नदीत कोसळले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पुलाचा काही भाग नदीत कोसळल्याचं पाहून घटनास्थळापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
 

Web Title: Video Bihar Bridge collapsed, BJP alleges of corruption; Now, Chief Minister Nitish Kumar said…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.