Video: पीडित मुलीच्या भेटीसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुग्णालयातच झोपल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 04:42 PM2023-08-22T16:42:16+5:302023-08-22T16:48:31+5:30
दिल्ली सरकारमधील एका अधिकाऱ्याने त्याच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे.
नवी दिल्ली - राजधानी दिल्ली सरकारमधील महिला व बाल कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी यासंदर्भात पोलिसांना नोटीस जारी केली होती. तर, सरकारने ही कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मात्र, पीडित मुलीवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या रुग्णालयाबाहेरच स्वाती मालीवाल यांनी अंथरुन टाकल्याचं पाहायला मिळालं.
दिल्ली सरकारमधील एका अधिकाऱ्याने त्याच्या मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० जुलै रोजी गुन्हा दाखल केला, मात्र आरोपी मोकाटच होता. आता, त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या भेटीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी रुग्णालयात गाठले होते. मात्र, पोलिसांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना मुलीची भेट घेण्यास नकार दिला. त्यामुळे, स्वाती मालीवाल यांनी रुग्णालयाबाहेरच आंदोलनाला सुरुवात केली. रात्रभर त्यांचं आंदोलन सुरुच होतं, त्यांनी रुग्णालयातच अंथरुन टाकून रात्राची झोप घेतली. आज दुपारी त्यांनी रुग्णालय सोडलं, मात्र मी पुन्हा रुग्णालयात धरणे आंदोलनासाठी येणार असल्याचंही सांगितलं.
VIDEO | DCW chief Swati Maliwal continues to sit on a 'dharna' outside St Stephen's Hospital in Delhi where the minor, allegedly raped and impregnated by a Delhi government official, has been admitted. Maliwal has claimed that she was stopped from meeting the victim.
— Press Trust of India (@PTI_News) August 22, 2023
(Source:… pic.twitter.com/ejLv7qtrV8
दिल्ली पोलीस गुंडांची पोलीस आहे. कुकर्मातील आरोपींना अटक करण्यासाठी हे पोलीस लायक नाहीत. मला पीडित मुलीची भेट घेऊन तिच्यावर कोणाचा दबाव तर नाही ना, याची खात्री करायची होती. पीडितेला मदत आणि कायदेशीर संरक्षण देण्याचा माझा प्रयत्न होता, असेही स्वाती मालीवाल यांनी म्हटले.
दरम्यान, १ ऑक्टोबर २०२० रोजी पीडित मुलगी वडिलांच्या निधनानंतर आरोपी व्यक्तीच्याच घरी राहात होती. आरोपीने नोव्हेबर २०२० ते जानेवारी २०२१ अल्पवयीन पीडितेवर अनेकदा बलात्कार केला. त्यातून, ती युवती गर्भवती राहिली होती. त्यानंतर, आरोपी अधिकाऱ्याच्या पत्नीने पीडितेवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. याप्रकरणी दिल्ली सरकारने दखल घेत चौकशी करुन आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.