VIDEO: विमानतळावर सीआरपीएफ जवानांसाठी टाळ्यांचा कडकडाट, लोकांनी व्यक्त केलं प्रेम आणि आदर
By शिवराज यादव | Published: October 9, 2017 02:40 PM2017-10-09T14:40:26+5:302017-10-09T15:00:29+5:30
जम्मू विमानतळावर केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान दिसताच उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
श्रीनगर - आपल्या सर्व इच्छा, कुटुंब मागे सोडून देशवासियांच्या सुरक्षेसाठी सीमारेषेवर उभं राहून आपल्या जीवाची बाजी लावतो तो म्हणजे जवान. भारतीय लष्करातील या जवानांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांच्याप्रती प्रत्येक देशवासियाच्या मनात आदर आहे, आणि तो असलाच पाहिजे. पण अनेकदा हे प्रेम किंवा कौतुक फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकताना दिसत असतं. पण जम्मू विमानतळावरील घटनेमुळे दृश्य बदलू लागल्याचं दिसत आहे. जम्मू विमानतळावर केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान दिसताच उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
जम्मू विमानतळावर केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची एक तुकडी दाखल झाली होती. बोर्डिंगसाठी हे सर्व जवान रांगेत उभे होते. हे सर्व जवान श्रीनगरला चालले होते. जवानांनी विमातळावर प्रवेश करताच विमानाच्या प्रतिक्षेत बसलेल्या प्रवाशांनी उभं राहून टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थितांनी जवानांचे धन्यवाद मानत त्यांच्याप्रती आदर, प्रेमभावना व्यक्त केल्या. लोकांनी पाठीवर दिलेली ही कौतुकाची थाप पाहून जवानांच्या चेह-यावरही आनंद दिसत होता. ही घटना 8 ऑक्टोबरची आहे.
अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये कैद करण्यास सुरुवात केली. काही जवानांनीदेखील व्हिडीओ शूट करत आठवण जपून ठेवली. सोशल मीडियावरही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Moving. Brave #CRPF jawans get an impromptu standing ovation and thunderous applause by public at the Jammu airport. #Respect 🙏 pic.twitter.com/csXehuia5A
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) October 9, 2017
याआधी दिल्लीत अशी घटना पहायला मिळाली होती. दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या भारतीय जवानांचं टाळ्यांचा कडकडाट करत कौतुक करण्यात आलं होतं. लोकांकडून असं जाहीर कौतुक होण्याची ही कदाचित देशातील पहिलीच घटना असावी. हे जवान विमानतळावर पोहोचले असता लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. अशाप्रकारे मिळणारा आदर आणि कौतुक पाहून जवानही भारावून गेले होते. मेजर गौरव आर्या यांनी विमानतळावरील व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
'भारतीय जवान यूएन मिशनवरुन परतले होते. दुपारी तीन वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानळावर त्यांचं आगमन झालं. यावेळी उपस्थित प्रवासी आणि कर्मचा-यांना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. भारतात हे असं होताना मी कधीच पाहिलेलं नाही. हे खूपच विलक्षण आहे. मला सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे', अशी प्रतिक्रिया मेजर गौरव आर्या यांनी दिली होती.