कोरोनामुळे सुप्रीम कोर्टामध्ये होणार आता व्हिडीओ कॉन्फरन्सने सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 06:20 AM2020-03-17T06:20:51+5:302020-03-17T06:21:24+5:30
सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. वकील संघटनांशी चर्चा व तांत्रिक सज्जता करून लवकरच ‘व्हिडीओ’ सुनावणी सुरू होईल
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कामकाज बंद ठेवणे शक्य नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी येत्या काही दिवसांत ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ने घेण्याचे ठरविले आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. वकील संघटनांशी चर्चा व तांत्रिक सज्जता करून लवकरच ‘व्हिडीओ’ सुनावणी सुरू होईल. नवी प्रकरणे ‘ई फायलिंग’ पद्धतीने दाखल करण्याची सोयही करण्यात येणार आहे. ही सेवा २४ तास सुरू राहील.
न्या. अरुण मिश्रा, न्या. उदय लळित, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. एल. नागेश्वर राव हेही बैठकीस हजर होते. ‘एम्स’चे डॉ. रणदीप गुलेरिया, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डॉ. बलराम भार्गव यांच्याखेरीज फोर्टिस, अपोलो व मेदान्ता या खासगी इस्पितळांच्या डॉक्टरांकडूनही सल्ला घेण्यात आला.
न्या. चंद्रचूड न्यायालयाच्या ‘ई कमिटी’चे प्रमुख आहेत. ‘व्हिडिओ सुनावणी’ घेणे शक्य आहे याची त्यांनी ग्वाही दिली. दोन्ही पक्षकारांचे वकील स्वतंत्र खोल्यांमध्ये व न्यायाधीश कोर्टात किंवा त्यांच्या चेंबरमध्ये बसतील. या तिघांमध्ये ‘व्हिडीओ लिंक’ स्थापन केली जाईल व त्या माध्यमातून सुनावणी होईल. माध्यम प्रतिनिधींनाही वेगळ्या खोलीत बसून ही सुनावणी पाहता/ऐकता येईल.
काही उपाय तातडीने सुरू
या बैठकीत ठरल्यानुसार काही उपायांची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली. त्यातील काही असे:
प्रवेशांवर नियंत्रण. आत येणाऱ्या प्रत्येकाची तापासाठी तपासणी.
गेल्या काही दिवसांत केलेला परदेश प्रवास, घरातील व जवळच्या लोकांचे आजारपण यासह सर्व माहितीचे फॉर्म प्रत्येकाकडून भरून घेणे.
न्यायालयात ठिकठिकाणी ‘हॅण्ड सॅनिटायजर’ ठेवणे व स्वच्छतागृहांमध्ये टिश्यू पेपरऐवजी ‘हॅण्ड ड्रायर’चा वापर.
प्रत्येकाने काम झाल्यावर न्यायालयात न थांबणे व व्हरांडे आणि आवारात घोळक्याने उभे न राहणे.