VIDEO : काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या गाडीवर फेकली अंडी
By Admin | Published: June 10, 2017 04:27 PM2017-06-10T16:27:12+5:302017-06-10T16:30:39+5:30
युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. 10 - युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. ओडिशा येथे युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राधामोहन सिंह यांच्या गाडीवर अंडी फेकली. गेस्ट हाऊसजवळील परिसरातील ही घटना आहे.
या घटनेनंतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील शेतकरी संपाचे हे परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
कारण केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांना मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन व तेथे पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या 5 शेतक-यांबाबत वार्ताहरांनी प्रश्न विचारला असता, राधामोहन सिंह म्हणाले की ""योगा करा"". असे धक्कादायक आणि अजब उत्तर राधामोहन सिंह यांच्याकडून मिळाले.
राधामोहन सिंह यांनी योगगुरू बाबा रामदेव यांनी आयोजित केलेल्या तीन दिवसीय योग शिबिराचे बिहारमधील मोतिहारी येथे (8 जून) उद्घाटन केले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी विचारलेल्या शेतकरी प्रश्नावर राधामोहन यांनी ""योगा करा"" असे सांगत मुद्दा टाळला.
#WATCH Youth Congress workers hurled eggs at Union Minister Radha Mohan Singh"s vehicle near Odisha state Guest house, 5 detained. pic.twitter.com/2NjBz8isFg
— ANI (@ANI_news) June 10, 2017
मध्य प्रदेशातील मंदसौरमधील हजारो शेतकरी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. शेतमालाला योग्य दर मिळावा, सोबत कर्जमाफी द्यावी, अशी येथील शेतक-यांची मागणी आहे. दरम्यान, पोलिसांच्या गोळीबारात ५ आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन मंगळवारी (6 जून) हिंसक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यासह अनेक वाहनांना आगीच्या हवाली केले.
दुसरीकडे पोलीस गोळीबारातच पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गुरुवारी दिली. आधी पोलिसांनी गोळीबार केलाच नव्हता, असा दावा मध्य प्रदेश सरकार करीत होते. पण पोलीस गोळीबार करीत असल्याची चित्रफीत जाहीर झाल्यानंतर गृहमंत्र्यांना ही कबुली द्यावी लागली.
तर गुरुवारी (8 जून) पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मंदसौरकडे जात असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पाच तासांनंतर सुटका करण्यात आली. त्यानंतर मध्य प्रदेश व राजस्थानच्या सीमेवर या शेतकऱ्यांचे कुटुंबीय राहुल गांधी यांना भेटले. मी केवळ त्यांना भेटायला आलो होतो. पण सरकार त्यालाही घाबरले, असे यावेळी राहुल म्हणाले.
श्रीमंतांचे १.५० लाख कोटींचे कर्ज मोदी माफ करू शकतात; पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकत नाहीत. शेतमालाला योग्य दर देऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि बोनस देऊ शकत नाहीत. ते शेतकऱ्यांना फक्त गोळ्या देऊ शकतात, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची ट्विटरवर एका व्हिडीओद्वारे शेतक-यांना संदेश दिला आहे. या व्हिडीओमध्ये चौहान असे म्हणालेत की, ""प्रिय बंधुभगिनींनो नमस्कार ! माझं सरकार शेतक-यांचे सरकार आहे. जनतेचं सरकार आहे. माझा श्वास जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत जनता आणि शेतक-यांसाठी काम करत राहणार"".
तर दुसरीकडे, देशातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुर्दशेला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. सर्वाधिक काळ देशाची सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला शेतकऱ्यांचा, कामगारांचा व गरिबांचा विसर पडल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केला.