VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:49 PM2024-10-22T15:49:10+5:302024-10-22T15:51:23+5:30
वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान TMC खासदार कल्याण बॅनर्जी आणि BJP खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे.
Waqf Board Bill : वक्फ बोर्डाबाबत स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या(JPC) बैठकीत मंगळवारी (22 ऑक्टोबर) पुन्हा मोठा गदारोळ झाला. भाजप आणि टीएमसीच्या खासदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यादरम्यान, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी इतके संतापले की, त्यांनी टेबलावरची काचेची बाटली समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला, पण बाटली तिथेट फुटली आणि कल्याण बॅनर्जी यांच्याच हाताला लागली.
Scuffle broke out during the Waqf JPC meeting in Parliament. According to eyewitnesses to the incident, TMC MP Kalyan Banerjee picked up a glass water bottle kept there and hit it on the table and hurt himself by accident: Sources
— ANI (@ANI) October 22, 2024
More details awaited pic.twitter.com/vMOkdZKwKP
मिळालेल्या माहितीनुसार, वक्फ विधेयकावरील जेपीसीची बैठक सुरू होताच कल्याण बॅनर्जी परवानगी न घेता उठून बोलू लागले, यावर भाजप खासदार अभिजित गंगोपाध्याय यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की, कल्याण बॅनर्जी यांनी टेबलावर ठेवलेली काचेची पाण्याची बाटली उचलून फेकण्याचा प्रयत्न केला, पण ती टेबलावर फुटून त्यांच्याच हाताला दुखापत झाली. दुखापतीमुळे त्यांच्या हाताला टाके घालावे लागले. या घटनेनंतर जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हे प्रकरण कसेबसे हाताळले.
हातात चार टाके
जखमी झालेल्या कल्याण बॅनर्जी यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्या हाताला चार टाकेही पडले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये कल्याण बॅनर्जी यांना AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि आम आदमी पार्टी (AAP) नेते संजय सिंह बैठकीच्या खोलीत नेत असल्याचे दिसत आहे. आता या घटनेनंतर कल्याण बॅनर्जी यांना JPC मधून निलंबित केले जाऊ शकते.
#WATCH | Delhi: Meeting of the JPC (Joint Parliamentary Committee) on the Waqf Bill begins at the Parliament Annexe. It was halted briefly after a scuffle broke out during the meeting.
— ANI (@ANI) October 22, 2024
According to eyewitnesses to the incident, TMC MP Kalyan Banerjee picked up a glass water… pic.twitter.com/vTR7xMwOb5
यापूर्वीही गदारोळ झाला
वक्फ विधेयकावर जेपीसीच्या बैठकीत गदारोळ होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या आठवड्यातही मोठा गदारोळ झाला होता, ज्यामुळे विरोधी खासदारांनी सभात्याग केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षाच्या खासदारांनी भाजप खासदारांवर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केला. याशिवाय, समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी भाजप खासदारांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, विरोधी पक्षाच्या खासदारांकडून अपशब्द वापरल्याचा आरोप भाजप खासदारांनी केला होता.