Video: पप्पा, नका ना कामाला जाऊ; पोलिसाच्या मुलाची वडिलांना विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:43 PM2019-05-08T13:43:19+5:302019-05-08T13:44:36+5:30
लोकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणारा पोलीस जेव्हा घरातून बाहेर पडतो, तो पुन्हा घरी कधी परतेल याचा नेम नसतो. अचानक काही घडलं तर पोलिसांना घरीही जाता येत नाही
नवी दिल्ली - लोकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणारा पोलीस जेव्हा घरातून बाहेर पडतो, तो पुन्हा घरी कधी परतेल याचा नेम नसतो. अचानक काही घडलं तर पोलिसांना घरीही जाता येत नाही. 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या या पोलिसाना घरच्यांना वेळही देता येत नाही. सध्या सोशल मिडीयावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुमच्या डोळ्यातूनही अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.
शनिवारी ट्विटवर एका पोलिसाने हा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर सोशल मिडीयात व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. जेव्हा पोलीस आपल्या शरीरावर वर्दी चढवून तयार होतो. त्यावेळी त्याचा मुलगा वडिलांचे पाय धरून जोरजोरात रडू लागतो. तो पोलीस कर्मचारी मी घरी लवकर परततो असं सांगूनही मुलाचं रडणं थांबत नाही.
1.25 सेकंदाचा हा व्हिडीओ एका आयपीएसने ट्विटवरुन शेअर केला आहे. @arunbothra यांच्याकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यामध्ये लिहिलं आहे की, ही वेळ पोलिसाच्या नोकरीची सर्वात भावूक वेळ असते. कठीण प्रसंग आणि 24 तास ड्युटी अशा परिस्थितीतून पोलीस अधिकाऱ्यांना या स्थितीचा सामना करावा लागतो. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
This is the toughest part of the police job. Due to long and erratic duty hours most of the police officers have to face this situation.
— Arun Bothra (@arunbothra) April 28, 2019
Do watch. pic.twitter.com/aDOVpVZ879
या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी तयारी करुन घरातून बाहेर निघत असतो. तेव्हा त्याचा मुलगा पाय धरून रडत असतो. पोलीस कर्मचारी मुलाला वारंवार समजवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र मुलगा कोणत्याही परिस्थितीत वडिलांना सोडायला तयार नसतो. ही परिस्थिती या एका पोलिसाची नाही तर पोलीस दलात काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पडणारा पोलीस कायम लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर ड्युटी करत असतो. या व्हिडीओला अनेकांना लाईक्स केलं असून पोलिसांच्या कार्याला सलामदेखील केला आहे.