Video : कोरोना गो... गो कोरोना गो... व्हायरसला पळविण्यासाठी आठवलेंची प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 10:26 AM2020-03-10T10:26:08+5:302020-03-10T10:30:49+5:30
रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाल आहे.
मुंबई - संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, अशातच कोरोना व्हायरसचे देशात 45 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात जगजागृती करण्यात येत आहे. तर, आरोग्यमंत्र्यांकडूनही योग्य ती माहिती पुरविण्यात येत आहे. मात्र, केंद्रीयमंत्रीरामदास आठवलेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्रीरामदास आठवले यांचा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाल आहे. त्यामध्ये, चायना-इंडिया साँग असे म्हणत, रामदास आठवले कोरोनो गो... गो कोरोना... गो... असे म्हणत आहेत. तर, आठवलेंसमवेत असलेला विदेशी नागरिकही गो कोरोना... कोरोना गो... असे म्हणत आहे. विशेष म्हणजे भारतीय ध्वजाचं चिन्ह असलेला एक फलकही या नागरिकांसोबत दिसत असून समोर मेणबत्ती पेटवलेल्या दिसत आहेत. रामदास आठवलेंच्या या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय. तसेच, केंद्रीयमंत्र्यांना हे शोभतं का, असा सवालही नेटीझन्सने केलाय. विशेष म्हणजे काही भाजपा नेत्यांनी यापूर्वी गोमुत्र आणि शेणाने कोरोना बरा होतो, असे विधान केले होते.
दरम्यान, महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. या रुग्णांवर नायडू हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही असं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं आहे.
होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा, ऊरुस पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असं प्रशासनाने सांगितले आहे. होळी सण कुटुंबासोबतच साजरा करा असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी केले आहे.